2 एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीने तिसरी यादी जाहीर केली होती. यामध्ये मनसेचा राजीनामा दिलेले वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान वंचितची पाचवी यादी समोर आली आहे. या पाचव्या यादीत दहा उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये रायगडमधून कुमुदिनी चव्हाण (हिंदू मराठा), धाराशिवमधून भाऊसाहेब अंधलकर (लिंगायत), नंदूरबारमधून हनुमंत सुर्यवंशी (टोकरे कोळी), जळगावातून प्रफुल्ल लोढा (जैन), दिंडोरीतून गुलाब बर्डे (भिल), पालघरमधून विजया म्हात्रे (मल्हार कोळी), भिवंडीतून निलेश सांबरे (हिंदू कुणबी), मुंबई उत्तरमधून बीना सिंह (क्षत्रिय), मुंबई उत्तर पश्चिममधून संजीव कालकोरी (ब्राम्हण) आणि मुंबई दक्षिण मध्यमधून अब्दूल हसन खान (मुस्लीम) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीसोबत फिस्कटल्याने प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात ते वारंवार काँग्रेसवर निशाणा साधत होते. प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांचे भाजपसोबत छुपे संबंध असल्याचा मोठा आरोप केला आहे. काँग्रेसने नांदेड लोकसभेतून असा उमेदवार दिला जो आठवड्याचे तीन दिवस डायलेसिसवर असतो आणि ज्याला फिरणं शक्य नाही. त्यामुळे नांदेडच्या जागेवर नाना पटोलेंनी अशोक चव्हाणांसोबत मिळून मॅच फिक्सिंग केल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.