लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदार संघातही आघाडी आणि युतीचे इच्छुक कामाला लागले आहे. या मतदार संघात आघाडी आणि युती बरोबरच शेतकरी संघटनाही मैदानात उतरणार आहे. त्यामुळे इथं चुरशीची तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर लोकसभेसाठी झालेल्या मतदानात राजुरा विधानसभा मतदार संघातून काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना 50 हजारा पेक्षा जास्तचे मताधिक्य होते. या मतदारसंघात विद्यमान आमदार हे काँग्रेसचेच आहेत. तर भाजपचे माजी आमदार मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे लोकसभेतील मताधिक्य टिकवण्याचे आव्हान काँग्रेस समोर असणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चंद्रपूर जिल्ह्यात बल्हारपूर,वरोरा,चिमूर,ब्रम्हपुरी,राजुरा,चंद्रपूर अश्या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. 2019 ला राजुरा विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत झाली होती. काँग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष धोटे, शेतकरी संघटनेचे वामनराव चटप, आणि भाजपचे संजय धोटे यांच्यात हा सामना रंगला होता. काँग्रेसच्या सुभाष धोटे यांना 60 हजार 228 मतं मिळाली होती. तर भाजपच्या संजय धोटे यांना 51 हजार 051 मतं मिळाली होती. शेतकरी संघटना वामनराव चटप यांना 57 हजार 727 मतं मिळाली होती. त्यांचा निसटता पराभव झाला होता. तर भाजप उमेदवाराली तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.
ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?
राजुराचे विद्यमान आमदार सुभाष धोटे काँग्रेसचे चंद्रपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. राजुरा विधानसभेतून धानोरकर यांना मोठं मताधिक्य मिळालं होते. काँग्रेसकडून सुभाष धोटे यांनाच उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित आहे. तर भाजपामध्ये तिकिट मिळविण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. भाजपचे माजी आमदार संजय धोटे हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नेते देवराव भोंगळे यांनीही मतदार संघात उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. 2019 च्या निवडणुकीत शेतकरी संघटनेच्या वामनरा चटप यांना निसटता पराभव स्विकाराला लागला होता. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. त्यांचा जनसंपर्क, त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यात विदर्भाचे नेते अशी त्यांची ओळख आहे.
ट्रेंडिंग बातमी - भास्कर जाधवांना गुहागरमध्ये कोणाचं आव्हान? स्वत: लढणार की मुलासाठी जागा सोडणार?
या विधानसभा क्षेत्रातून उभ्या असणाऱ्या उमेदवारांसाठी जातीय समीकरण महत्त्वाचे ठरत असते. या मतदार संघात ओबीसी, दलित, आदिवासी यांची संख्या मोठी आहे. ओबीसीमध्ये खैरे कुणबी आणि धनोजे कुणबी यांच्यात नेहमी स्पर्धा बघायला मिळाली आहे. काँग्रेसचे धोटे खैरे कुणबी समाजाचे आहेत. हा समाज नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. तर शेतकरी संघटनेचे चटप, भाजपचे धोटे हे धनोजे कुणबी समाजाचे आहेत. त्यामुळे या समाजाचे मते विभागण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात गोंडवाना गणतंत्र पार्टीची ताकद सुद्धा मोठी आहे. आदिवासी समाजाचे बहुतांश मते गोंडवाना गणतंत्र पार्टीकडे वळू शकतात. अश्यात दलित, मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत.
ट्रेडिंग बातमी - कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण बाजी मारणार? महाडिक विरुद्ध पाटील सामना रंगणार
राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या राजुरा विधानसभा मतदार संघ आहे. यात कोरपना, जीवती, राजुरा, गोंडपिपरी या तालुक्याचा समावेश होतो. विधानसभेत एकूण लोकसंख्या 4,20,301 आहे. तर मतदाराची संख्या 3,33,605 इतकी आहे. विजयासाठी किमान 60 ते 65 हजार मतांची आवश्यकता उमेदवारांना असणार आहे.या मतदार संघात तिरंगी लढती मुळे चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय कोणत्या पक्षात बंडखोरी झाल्यास त्याचाही परिणाम जय पराजयावर होण्याची दाट शक्यता आहे. सध्याची स्थिती पाहाता काँग्रेसचे मनोबल इथं वाढले आहे. तर शेतकरी संघटना हा मतदार संघ आपल्याकडे खेचण्याच्या तयारीत आहे.