मनोज सातवी
मराठी भाषेचा अपमान केल्याच्या प्रकरणात अखेर विरारमधील त्या मुजोर रिक्षाचालकाला शिवसेना (UBT) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. मात्र मराठी भाषा मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा कोणी अनादर करत असेल तर त्यांना याच पद्धतीने उत्तर मिळेल असा इशारा शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. विरार स्टेशनच्या बाहेर भर रस्त्यावर राजू पटवा या रिक्षा चालकाला शिवसेना (UBT) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. काही दिवसांपूर्वी या रिक्षाचालकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात तो मराठीत विचारणा करणाऱ्या भावेश पडोलीया आणि त्याच्या बहिणीला मारहाण करताना दिसत होता.
राजू पटवा नावाच्या रिक्षा चालकाने मराठीत बोलणाऱ्यांना हिंदी बोलण्याची सक्ती करत होता. शिवाय त्यांच्याशी अत्यंत उद्धटपणे बोलत होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अखेर शिवसेना (UBT) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला शोधून काढले. ऐवढेच नाही तर त्याला भर रस्त्यात चांगलाच चोप दिला. मराठी भाषेचा आणि माणसाचा अपमान कोणीही केला तर त्याला आम्ही शिवसेना स्टाईलमध्येच उत्तर देणार असं ठाकरे गटाचे विरार शहर प्रमुख उदय जाधव यांनी स्पष्ट केलं.
या मुजोर रिक्षाचालकाला केवळ चोपच दिला नाही तर ज्या भावेश पडोलीया आणि त्याच्या बहिणीला मारहाण केली होती, त्यांच्यापुढे माफी मागायला लावली. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि महापुरुषांचा देखील सन्मान करण्याची शपथ ही त्याला यावेळी घ्यायला लावली. त्यामुळे हे प्रकरण आता चांगलच तापताना दिसतं आहे. परप्रांतीयांनी महाराष्ट्रात आलं की, मराठीचा सन्मान करायलाच हवा. जर कोणी अपमान केला, तर असाच चोप मिळेल. असं रुपेश पाटील हे स्थानिक यावेळी म्हणाले. महाराष्ट्राने प्रत्येकाला रोजगार दिला आहे. पण त्याबदल्यात मराठी भाषेचा अपमान करणं हे पूर्णपणे चुकीचे आहे, असं ही काही जण म्हणाले.
या प्रकरणावर उत्तर भारतीय नेत्यांचाही संताप व्यक्त झाला आहे. त्यांनी कायदा हातात घेण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. लोकांना मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ही अराजकता आहे. अशा घटनांवर सरकारने कठोर पावलं उचलावीत असं उत्तर भारतीय समाजाचे नेते शिवप्रताप सिंह यांनी म्हटलं आहे. या घटनेने मराठी अस्मिता, परप्रांतीय-स्थानीक संघर्ष आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. स्थानिकांचे म्हणणे स्पष्ट आहे मराठीचा सन्मान झाला पाहिजे, पण कायदा हातात घेणं कितपत योग्य हे विचारात घेणं गरजेचं ठरतं आहे. मराठीचा सन्मान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, मात्र याचे पालन करताना कायद्याचाही आदर राखणं तितकंच गरजेचं आहे असा ही मतप्रवाह आहे.