Why Navneet Rana Missed Rajya Sabha Ticket: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेवर निवडून आल्यानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता, ज्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. महायुतीमध्ये ही जागा कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली. पण या जागेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह माजी भाजपा खासदार नवनीत राणा देखील शर्यतीत होत्या. राणा यांना ही संधी का मिळाली नाही? राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्यासमोर कोणती अट ठेवली होती? याचा संपूर्ण घटनाक्रम आता स्वतः नवनीत राणा यांनी जाहीर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची नवनीत राणांसमोर मोठी अट
नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहून गेल्या काही दिवसांतील सर्व घडामोडींचा उलगडा केला आहे. नवनीत राणा यांच्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दर्शवली होती. स्वतः सुनेत्रा पवार, अजितदादा पवार आणि पार्थ पवार यांनी नवनीत राणा यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत त्यांना उमेदवारी देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
मात्र, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं नवनीत राणांसमोर एक मोठी अट ठेवली होती. राज्यसभेची उमेदवारी हवी असेल, तर नवनीत राणा यांना अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा लागेल, अशी ती अट होती.
( नक्की वाचा : Chhagan Bhujbal: नाराज भुजबळ राष्ट्रवादीला 'जय महाराष्ट्र' करणार? समर्थकांनी दिले राजकीय भूकंपाचे संकेत )
राणांचा स्पष्ट नकार
अजित पवार यांच्या पक्षाने ठेवलेली ही अट नवनीत राणा यांनी साफ फेटाळून लावली. त्यांनी स्पष्ट केले की, त्या कोणत्याही पदासाठी आपली राजकीय विचारधारा बदलणार नाहीत. नवनीत राणा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम करणाऱ्या एक प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्या आहेत. केवळ राज्यसभेच्या पदासाठी भाजपा सोडून राष्ट्रवादीत जाणे त्यांना मान्य नव्हते, ज्यामुळे त्यांची राज्यसभेची ही मोठी संधी हुकली आहे.
मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
या संपूर्ण प्रकरणाची इनसाईड स्टोरी सांगताना नवनीत राणा म्हणाल्या की, त्यांचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ही राज्यसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याबाबत विनंती केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरूनच नवनीत राणा यांनी आधी त्यांची आणि नंतर सुनेत्रा पवार व अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. ही जागा भाजपला सोडण्याबाबत महायुतीत सकारात्मक चर्चा सुरू होती, मात्र काही अपरिहार्य कारणास्तव राष्ट्रवादीला ही जागा भाजपसाठी सोडणे शक्य झाले नाही.
अटीमुळे सुटली संधी, तरीही मानले आभार
पक्षात प्रवेश करण्याची अट मान्य नसल्यामुळे नवनीत राणा यांनी ही उमेदवारी नाकारली असली, तरी त्यांनी अजित पवार यांच्या कुटुंबाचे आभार मानले आहेत. आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला राज्यसभेवर पाठवण्याचा विचार केल्याबद्दल त्यांनी सुनेत्रा पवार, अजित पवार आणि पार्थ पवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : Sameer Bhujbal: भुजबळ नाराज असतानाच पुतण्याने उघड केले पडद्यामागचे सत्य; 'या' कारणामुळे हुकली मंत्रिपदाची संधी )
पद मिळाले नाही तरी त्या सदैव भारतीय जनता पक्षाचे कार्य प्रामाणिकपणे करत राहतील, असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले आहे. या जागेवर आधी मंत्री छगन भुजबळ देखील इच्छुक होते, मात्र पक्षांतर्गत अटी आणि समीकरणामुळे अखेर प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना ही लॉटरी लागली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world