जाहिरात

विधानसभेनंतर शरद पवारांकडे परत जाणार? अजित पवारांचे उत्तर काय?

अजित पवारांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत प्रश्नांची धडाधड उत्तरं दिली आहेत. मात्र शरद पवारांकडे परतणार का? या प्रश्नाला त्यांनी दिलेला उत्तराने सर्वांचेच कान टवकारले आहेत.

विधानसभेनंतर शरद पवारांकडे परत जाणार? अजित पवारांचे उत्तर काय?
मुंबई:

सुनेत्रा पवारांना लोकसभेला तिकीट कोणी दिलं? त्यांना उभे करण्याचा निर्णय कोणाचा होता? लोकसभा निवडणुकीत काय चुकलं? या आणि या सारख्या अनेक प्रश्नांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी थेट उत्तरं दिली आहेत. वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या प्रश्नांची धडाधड उत्तरं दिली आहेत. मात्र शरद पवारांकडे परतणार का? या प्रश्नाला त्यांनी दिलेला उत्तराने सर्वांचेच कान टवकारले आहेत. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरद पवारांकडे परतणार का? 

अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का या प्रश्नाला काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिलं होतं. कार्यकर्त्यां बरोबर चर्चा करू आणि नंतर निर्णय घेवू असे ते म्हणाले होते. यापार्श्वभूमीवर अजित पवारांना शरद पवारांकडे परतणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी थेट नो कॉमेंन्ट्स असं उत्तर दिलं. यावर अधिक बोलणे त्यांनी टाळले. त्या या प्रश्नाला हो कींवा नाही असं थेट उत्तर देणं टाळलं आहे. त्यामुळे शरद पवारांकडे परतण्याचे सर्वच दरवाजे अजित पवारांनी बंद केलेले नाहीत अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ही निवडणूक महायुतीकडून लढत आहे. त्यामुळे राज्यात आम्हाला स्पष्ट बहूमत मिळावं हे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी आम्ही मतदारांना आवाहन करत आहोत. राज्यातले मतदार ठरवतील कोणाला सत्ता द्यायची ते असंही पवार यावेळी म्हणाले.  

ट्रेंडिंग बातमी - बारामतीतून अजित पवारांची माघार? निवडणूक न लढण्याचे कारण काय?

'ती माझी चुक झाली' 

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उभे करणे ही चुक होती असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. निवडणूक झाल्यानंतर मी विचार करायचो. कसं झालं? का झालं? जे झालं त्याला मी जबाबदार आहे. मला वाटलं की सुप्रिया विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. तसं करणं हे कुटुंबासाठी चुकीचे होतं याची कबुलीच अजित पवार यांनी दिली. आम्ही कुटुंब म्हणून अनेक वर्ष एकत्र आहोत. पण या निवडणुकीने कुटुंबाला एकमेका विरोधात उभं केलं. त्यात कोणी तरी हरणार होतं, कोणी तरी जिंकणार होतं. मात्र त्यातून त्रास दोघांना होणार होता. त्यामुळे जे मनात आले ते बोललो असे त्यांनी स्पष्ट केले. 

ट्रेंडिंग बातमी -  अजित पवार निवडणूक लढणार की नाही? तटकरेंनी आतली बातमी दिली

तो निर्णय नक्की कोणाचा? 

सुनेत्रा पवार यांना बारामतीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय बोर्डाचा होता. त्यानुसार त्यांना उमेदवारी देण्यात आली असेही अजित पवार यांनी यामुलाखतीत स्पष्ट केले. आमच्या वाट्याला लोकसभेच्या कमी जागा आल्या होत्या. चार जागा आम्ही लढलो. त्यातली एक ही बारामतीची होती. त्यामुळे या जागा जिंकण्याचे लक्ष्य आम्ही ठेवलं होतं. पण आम्हाला पाहीजे तेवढे यश मिळालं नाही. केवळ रायगडची जागा आम्हाला जिंकता आली.  

ट्रेंडिंग बातमी - मविआचं ठरलं, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार!

आम्हाला 'त्या' समाजाची मते मिळाली नाहीत

लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह पसरवण्यात आले. त्यामुळे मुस्लिम समाज असो की दलीत समाज असो त्यांची मते आम्हाला मिळाली नाहीत. आदिवासी समाजही आमच्यापासून दुरावला असे अजित पवार यांनी सांगितले. संविधान बदलणार. आरक्षण जाणार. यामुळे दलीत आदिवासी समाज घाबरला. त्यांनी आम्हाला मतदान केले नाही. तर सीएएच्या भितीने मुस्लिम समाजही दुरावला असे अजित पवार म्हणाले. या निवडणुकीत आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. या निवडणुकीत आम्ही कोणतेही आरोप करणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढू. विकासाचेच मुद्दे मांडू असं त्यांनी स्पष्ट केलं. 

ट्रेंडिंग बातमी -  पंतप्रधान मोदींनी स्वत:चाच रेकॉर्ड मोडला; लाल किल्ल्यावर पुन्हा रचला इतिहास!

'मुख्यमंत्री होणं नशिबाचा भाग' 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना मी सिनिअर आहे. पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे माझ्या मागून येवून मुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे आकडे होते. नशिब होतं. जे नशिबात असतं ते होतं असं अजित पवार म्हणाले. उद्धव ठाकरे हे एकही निवडणूक न लढता थेट मुख्यमंत्री झाले. पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत होते. केंद्रात मंत्री होते. तेही राज्यात आले आणि मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ते आमदार झाले. जे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते तेही या राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांच्याकडे त्यासाठी पुरेसे आमदारांचे संख्याबळ होते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री होणे शक्य झाले, असे पवार यांनी स्पष्ट केले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com