
India vs Pakistan, Asia Cup 2025 : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आशिया कप स्पर्धेतील सामना होऊन आता दोन दिवस झाले आहेत. त्यानंतरही या मॅचवरील वाद कायम आहेत. भारतीय क्रिकेट टीमनं ही मॅच खेळल्याच्या मुद्यावर विरोधी पक्षांनी बीसीसीआय तसंच सत्तारुढ मोदी सरकारवर टीका केलीय. त्याचवेळी आम आदमी पक्षाच्या नेत्यानं आता टीम इंडियाच्या T20 टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादवला टार्गेट केलंय.
काय आहे प्रकरण?
सूर्यकुमार यादवने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना भारताचा विजय समर्पित केला होता.त्यावरून आम आदमी पार्टी (AAP) नेते सौरभ भारद्वाज यांनी सूर्यकुमार यादवला लक्ष्य केलंय. तुझ्यात हिंमत असेल तर सामन्यातून मिळालेली सर्व कमाई पीडितांच्या कुटुंबियांना दान करा, असे आव्हान भारद्वाज यांनी दिले आहे.
पत्रकारांशी बोलताना 'आप'चे माजी आमदार भारद्वाज म्हणाले, "त्याने इतक्या सहजपणे हा विजय पहलगाम हल्ल्यातील पीडितांना समर्पित केला. तुम्ही खूप समजूतदार आहात. तुमची, बीसीसीआयची (BCCI) आणि आयसीसीची (ICC) 'औकात' असेल तर आम्ही तुम्हाला दुसरे आव्हान देतो. तुम्ही या सामन्यातून ब्रॉडकास्टिंग आणि जाहिरातदारांकडून जितके पैसे कमावले आहेत, ते सर्व 26 पीडित विधवांना देऊन टाका. तरच आम्ही मानू की तुम्ही खऱ्या अर्थाने हा विजय समर्पित केला आहे."
"त्यांच्यात असे काही करण्याची हिंमत नाही. ते फक्त वरवरचे बोलतात की आम्ही हे याला समर्पित करतो, ते त्याला समर्पित करतो. हे खूपच लाजिरवाणे आहे," असेही भारद्वाज पुढे म्हणाले.
( नक्की वाचा : IND vs PAK: पराभवानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ, शाहिद आफ्रिदीने जावई शाहीनला सर्व जगासमोर झापले ! पाहा Video )
भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध का?
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटक मारले गेले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान-आधारित लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनेची उपसंस्था असलेल्या 'द रेसिस्टन्स फ्रंट' (TRF) ने घेतली होती. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी जोर धरली होती, मात्र बीसीसीआयने सामना खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बीसीसीआयवर जोरदार टीका झाली होती.
पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल 7 ते 10 मे दरम्यान भारताच्या तिन्ही संरक्षण दलांनी सीमेवर ‘ऑपरेशन सिंदूर' राबवले होते. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते.
भारताच्या विजयानंतर सूर्यकुमार यादवने हा विजय 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये सहभागी झालेल्या भारतीय लष्कराला समर्पित केला आणि टीम "पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहे," असे सांगितले. तसेच, या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. टॉसच्या वेळीही दोन्ही टीमच्या कॅप्टननं (सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा) हस्तांदोलन केले नाही.
सौरभ भारद्वाज यांच्या या टीकेवर सूर्यकुमार यादव, बीसीसीआय किंवा आयसीसीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world