Asia Cup, IND vs PAK: सूर्यकुमारने भावनिक प्रतिक्रिया देत कोट्यवधी भारतीयांचं मन जिंकलं, विजयानंतर म्हणाला...

IND vs PAK : सूर्यकुमार यादवने कर्णधाराला साजेशी खेळी करत 37 चेंडूंमध्ये नाबाद 47 धावा केल्या आणि षटकार मारून सामना जिंकला. भारताने हे लक्ष्य 15.5 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Asia Cup, IND vs PAK: आशिया कप 2025 च्या बहुप्रतिक्षित सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. भारतीय संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये वर्चस्व गाजवले. विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने ही ऐतिहासिक कामगिरी भारतीय सेनेला आणि पहलगाम हल्ल्यातील पीडितांना समर्पित केली.

सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमारने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, "आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबांच्या पाठीशी उभे आहोत आणि त्यांच्यासोबत आमची एकजूटता व्यक्त करतो. हा विजय आमच्या सर्व सशस्त्र दलांना समर्पित आहे, ज्यांनी प्रचंड शौर्य दाखवले आहे. आशा आहे की ते आम्हाला सर्वांना प्रेरणा देत राहतील."

सामन्यात काय घडलं?

पाकिस्तानने भारताला विजयासाठी 128 धावांचे माफक आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर अभिषेक शर्माने शाहीन आफ्रिदीच्याप पहिल्या दोन चेंडूंवर चौकार आणि षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले. त्याने अवघ्या 13 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 31 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने कर्णधाराला साजेशी खेळी करत 37 चेंडूंमध्ये नाबाद 47 धावा केल्या आणि षटकार मारून सामना जिंकला. भारताने हे लक्ष्य 15.5 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले.

गोलंदाजीत कुलदीपची कमाल

त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात निराशाजनक झाली. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी सुरुवातीलाच पाकिस्तानला धक्के दिले. त्यानंतर भारतीय फिरकी गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजीचा धुव्वा उडवला. कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 127 धावाच करू शकला.

Advertisement

कुलदीप यादवने 4 षटकांत 18 धावा देत 3 बळी घेतले, तर अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक 40 धावा केल्या, तर शेवटी शाहीन आफ्रिदीने 16 चेंडूंमध्ये 33 धावांची नाबाद खेळी करून संघाला 100 च्या पुढे पोहोचवले.