जाहिरात

AUS vs SL : ऑस्ट्रेलियाची 'लंका' लागली! श्रीलंकेनं हरवल्यानंतर आता हेच आहे 'क्वालिफिकेशन'चं समीकरण

AUS vs SL T20 World Cup 2026: T20 वर्ल्ड कप 2026 मधील ऑस्ट्रेलियाची निराशाजनक कामगिरी सुरु आहे.

AUS vs SL : ऑस्ट्रेलियाची 'लंका' लागली! श्रीलंकेनं हरवल्यानंतर आता हेच आहे 'क्वालिफिकेशन'चं समीकरण
AUS vs SL : T20 वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलियाचं आव्हान आता धोक्यात आलंं आहे.
मुंबई:

AUS vs SL T20 World Cup 2026: T20 वर्ल्ड कप 2026 मधील ऑस्ट्रेलियाची निराशाजनक कामगिरी सुरु आहे.  पल्लेकेलेच्या मैदानावर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. पथुम निसांकाच्या वादळी शतकाच्या जोरावर श्रीलंकेने हा सामना 8 विकेटने खिशात घातला. या विजयामुळे श्रीलंकेने सुपर 8 मध्ये दिमाखात प्रवेश केला असला, तरी ऑस्ट्रेलियाच्या अडचणी मात्र आता प्रचंड वाढल्या आहेत. हा सामना गमावल्यामुळे ऑस्ट्रेलिया आता स्पर्धेतून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यांना आता पुढच्या फेरीत जाण्यासाठी इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.

कांगारूंची दमदार सुरुवात आणि मोठी घसरण

श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शनाका याने टॉस जिंकून आधी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. बॅटिंगसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खरंतर खूपच खतरनाक झाली होती. ट्रॅव्हिस हेड आणि कॅप्टन मिचेल मार्श यांनी श्रीलंकन बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. मार्शने या टूर्नामेंटमधील आपला पहिलाच सामना खेळताना केवळ 27 बॉलमध्ये 54 रन्स केले. 

मार्शने ट्रॅव्हिस हेडसोबत मिळून केवळ 8.3 ओव्हर्समध्ये 104 रनची पार्टनरशिप केली होती. हेडने सुद्धा तडाखेबंद बॅटिंग करत 29 बॉलमध्ये 56 रन बनवले होते.

 श्रीलंकेने असा फिरवला सामना

एका वेळी ऑस्ट्रेलियाचा स्कोर बिनबाद 108 रन असा होता, पण तिथून कांगारूंच्या टीमची लय बिघडली. हेड, मार्श, कॅमेरून ग्रीन आणि टिम डेव्हिड हे एकामागून एक झटपट बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 130 अशी झाली. शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये तर ऑस्ट्रेलियाने केवळ 6 रनमध्ये 4 विकेट गमावल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाची पूर्ण टीम 181 रनवर ऑल आऊट झाली. श्रीलंकेच्या बॉलर्सनी मोक्याच्या क्षणी विकेट्स काढून ऑस्ट्रेलियाला मोठ्या स्कोरपासून रोखले.

पथुम निसांकाचा  धमाका

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 182 रनच्या टार्गेटचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या बॅटर्सनी कोणतीही चूक केली नाही. पथुम निसांकाने मैदानाच्या चोहोबाजूला फटकेबाजी करत केवळ 52 बॉलमध्ये सेंच्युरी पूर्ण केली. त्याला कुसल मेंडिसने मोलाची साथ दिली आणि त्याने हाफ सेंच्युरी झळकावली. या दोघांच्या बॅटिंगमुळे श्रीलंकेने हे टार्गेट 18 ओव्हर्समध्येच पूर्ण केले आणि 8 विकेटने मोठा विजय मिळवला. श्रीलंकेचा हा या टूर्नामेंटमधील सलग तिसरा विजय ठरला आहे.

(नक्की वाचा : T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय, माजी विजेत्यांचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात! )
 

ऑस्ट्रेलियाच्या क्वालिफिकेशनचे गणित काय?

या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचे भवितव्य आता टांगणीला लागले आहे. ऑस्ट्रेलियाचे आता केवळ 2 पॉईंट्स असून त्यांना सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी झिम्बाब्वेच्या पराभवाची प्रार्थना करावी लागणार आहे.ऑस्ट्रेलियानं ओमानला पराभूत केलं तरी ते लगेच क्वालिफाय होतील असं नाही. ओमानवरील विजयानंतरही ऑस्ट्रेलियाचे 4 पॉईंट्स होतील. त्यांचे भवितव्य झिम्बाब्वेवर अवलंबून असेल 

झिम्बाब्वेला त्यांचे उरलेले दोन्ही सामने आयर्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध हरावे लागतील. तसे झाले तरच ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी चुरस पाहायला मिळेल. श्रीलंकेनं मात्र 6 पॉईंट्ससह आरामात पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com