भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा एकदा झिरो टॉलरन्स धोरण स्पष्ट केले आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने केलेल्या चौकशीत दोषी आढळल्यानंतर, बीसीसीआय लोकपाल यांनी मुंबई टी-20 लीगच्या फ्रँचायझी मालक गुरमीत सिंग भामरा यांच्यावर क्रिकेटशी संबंधित सर्व उपक्रमांवर बंदी लादली आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेटच्या पारदर्शकतेला बाधा पोहोचवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा संदेश या निर्णयाद्वारे देण्यात आला आहे.
नेमके काय आहे 2019 चे मॅच फिक्सिंग प्रकरण?
बीसीसीआयचे लोकपाल न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी या प्रकरणाचा सविस्तर निकाल देताना घटनेचा संपूर्ण क्रम स्पष्ट केला. हे संपूर्ण प्रकरण 2019 मध्ये खेळवल्या गेलेल्या मुंबई टी-20 लीगच्या उपांत्य सामन्याशी संबंधित आहे. सामन्याचा निकाल निश्चित करण्यासाठी गुरमीत सिंग भामराह यांनी संघातील खेळाडूशी थेट संपर्क साधला होता.
संबंधित खेळाडूने गुरमीत यांच्या प्रस्तावाला बळी न पडता तातडीने बीसीसीआयच्या लाचप्रतिबंधक व भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेकडे अधिकृत तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर बीसीसीआयच्या पथकाने कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान गुरमीत यांच्याविरुद्ध मॅच फिक्सिंगचे ठोस पुरावे सापडल्याने हे प्रकरण अंतिम निर्णयासाठी बीसीसीआय लोकपाल यांच्याकडे पाठवण्यात आले होते.
परदेशी लीगमधील सहभाग अन् कठोर कारवाईचे संकेत
लोकपाल न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे की, मॅच फिक्सिंग आणि भ्रष्टाचारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारची गय केली जाऊ शकत नाही. गुरमीत सिंग भामराह यांचा केवळ मुंबई टी-20 लीगपुरताच सहभाग नव्हता, तर ते कॅनेडियन टी-20 लीगसह इतर विविध देशांतील क्रिकेट लीगमधील संघांनाही आर्थिक पाठबळ पुरवत होते.
या निर्णयामुळे स्थानिक टी-20 लीग चालवणाऱ्या आणि त्यात गुंतवणूक करणाऱ्या इतर फ्रँचायझी मालकांना बीसीसीआयने अत्यंत कडक इशारा दिला आहे.