आगामी टी20 वर्ल्ड कपपूर्वीच बीसीसाीआयनं राहुल द्रविडच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरु केला आहे. द्रविडची मुख्य प्रशिक्षकपदाची मुदत जून महिन्यात होणाऱ्या T20 वर्ल्ड कपनंतर संपतीय. द्रविडनं यापुढील काळात कोच म्हणून राहण्यास उत्सुक नसल्याचं बीसीसीआयला कळवलंय. त्यानंतर नव्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयनं जाहिरात दिलीय. 27 मे रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या पदासाठी अर्ज करता येतील.
बीसीसीआयनं जाहिरात देताच अनेक माजी खेळाडूंची नावं चर्चेत आहेत. सर्वप्रथम चेन्नई सुपर किंग्सचा मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंगचं नाव चर्चेत आलं. कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीर ही बीसीसीआयची पसंती असल्याचं वृत्तही प्रसिद्ध झालं आहे. त्याचबरोबर रिकी पॉन्टिंग आणि जस्टीन लँगर या माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची नावंही चर्चेत होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या 6 वर्षांपासून दिल्ली कॅपिटल्सचा कोच असलेल्या रिकी पॉन्टिंगनं आपल्याला बीसीसीआयनं विचारणा केली होती. आपण ती ऑफर नाकारली, असं पॉन्टिंगनं आयसीसीशी बोलताना सांगितलं होतं. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी पॉन्टिंगचा हा दावा फेटाळला. मी किंवा बीसीसीआयच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यानं ऑस्ट्रेलियन खेळाडूशी याबाबत संपर्क साधलेला नाही, असं जय शहा यांनी स्पष्ट केलंय.
काय म्हणाले जय शहा?
जय शहा यांनी शुक्रवारी या विषयावर एक वक्तव्य प्रसिद्ध केलंय. 'मी किंवा बीसीसीआयनं कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला कोचिंगसाठी संपर्क केलेला नाही. याबाबत काही मीडियामध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्त चूक आहे. राष्ट्रीय टीमसाठी प्रशिक्षक निवडण्याची प्रक्रिया मोठी आहे. भारतीय क्रिकेटच्या स्वरुपाची नीट समज असलेला आणि स्वत:च्या गुणवत्तेच्या जोरावर शिखरापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीचा आम्ही शोध घेत आहोत. टीम इंडियाला पुढच्या लेव्हलला नेण्यासाठी आमच्या कोचला देशांतर्गत क्रिकेटचं ज्ञान असणे अतिशय आवश्यक आहे, असं जय शहा यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : ऑस्ट्रेलियाला पाणी पाजणाऱ्या दिग्गज खेळाडूला व्हायचंय टीम इंडियाचा कोच )
काय म्हणाला होता पॉन्टिंग?
आयसीसीनं रिकी पॉन्टिंगच्या हवाल्यानं याबाबतचं वृत्त दिलं होतं. त्यानुसार पॉन्टिंगनं सांगितलं होतं की, ' याबाबत अनेक रिपोर्ट पाहिले आहेत. साधरणत: या गोष्टी तुम्हाला माहिती होण्यापूर्वीच सोशल मीडियावर येतात. आयपीएलच्या दरम्यान थोडी-बहुत चर्चा झाली होती. मी हे काम करणार की नाही हे समजून घेण्यासाठी ते समजून घ्यायचं होतं. मला एका राष्ट्रीय टीमचा कोच व्हायला आवडेल. पण, माझ्या आयुष्यात अन्य काही गोष्टी आहेत. मला सध्या घरी काही वेळ घालवायचा आहे. भारतीय टीमसोबत काम करताना तुम्ही आयपीएल टीम जॉईन करु शकत नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे. त्याचबरोबर एका राष्ट्रीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकाला वर्षातले 10 ते 11 महिने काम आहे. ते सध्या माझ्या लाईफ स्टाईलमध्ये बसत नाही,' असं पॉन्टिंगनं स्पष्ट केलं होतं.