जाहिरात
This Article is From May 21, 2024

ऑस्ट्रेलियाला पाणी पाजणाऱ्या दिग्गज खेळाडूला व्हायचंय टीम इंडियाचा कोच

New Team India Coach : जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविडची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची मुदत संपणार आहे.

ऑस्ट्रेलियाला पाणी पाजणाऱ्या दिग्गज खेळाडूला व्हायचंय टीम इंडियाचा कोच
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आणखी एक नाव पुढं आलं आहे. (फोटो AFP)
मुंबई:

जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविडची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची मुदत संपणार आहे. द्रविडनंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक कोण होणार? याबाबत क्रिकेट विश्वात चर्चा सुरु आहे. बीसीसीआयनं या पदासाठी चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग तसंच कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मेंटॉर गौतम गंभीर यांच्याशी संपर्क साधल्याचं वृत्त प्रसिद्ध झालंय. रिकी पॉन्टिंग आणि जस्टीन लँगर या ऑस्ट्रेलियन दिग्गजांची नावं देखील चर्चेत आहेत. त्याचवेळी  माजी भारतीय क्रिकेटपटूनं टीम इंडियाचा कोच होण्याची इच्छा व्यक्त केलीय.

ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केलीय. हरभजननं ANI वृत्तसंस्थेशी बोलताना त्याची इच्छा व्यक्त केलीय. 'मी अर्ज करेन की नाही हे मला माहिती नाही. भारतीय टीमचा प्रशिक्षक होणं हे मॅन मॅनेजमेंटचं काम आहे. खेळाडूंना ड्राईव्ह आणि पूल शिकवण्याची गरज नाही. ते त्यांना चांगलं माहिती आहे. तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. क्रिकेटनं मला खूप काही दिलंय. मला जर त्याची परतफेड करण्याची संधी मिळाली तर मला अतिशय आनंद होईल,' असं हरभजननं स्पष्ट केलंय. 

भारतामध्ये 2023 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपनंतरच राहुल द्रविडची प्रशिक्षकपदाची मुदत संपली होती. पण आगामी टी20 वर्ल्ड कपचा विचार करुन बीसीसीआयनं द्रविडला जून 2024 पर्यंत मुदतवाढ दिली होती. भारतीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी 27 मे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

( नक्की वाचा : IPL 2024 : सुपर फ्लॉप ते ब्लॉकब्लास्टर! RCB च्या सलग 6 विजयाचं रहस्य काय? )
 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सरस खेळ

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 2001 साली झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये हरभजन पहिल्यांदा प्रभावी कामगिरी केली होती. त्या सीरिजधील 6 इनिंगमध्ये हरभजननं तब्बल 32 विकेट्स घेत भारताच्या मालिका विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. टेस्ट क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय बॉलर असा रेकॉर्डही हरभजनच्या नावावर आहे. त्यानं याच सीरिजमधील कोलकाता टेस्टमध्ये तो विक्रम केला होता.

हरभजननं 143 टेस्टमध्ये 417 विकेट्स घेतल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये 400 पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या तीन भारतीय स्पिनर्समध्ये त्याचा समावेश आहे. त्याचबरोबर हरभजनच्या नावावर 236 वन-डेमध्ये 269 तर 28 टी20 इंटरनॅशनलमध्ये 25 विकेट्स आहेत.  2007 मधील टी20 वर्ल्ड कप तर 2011 साली वन-डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा हरभजन सदस्य आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या तीन आयपीएल टीमचं त्यानं प्रतिनिधित्व केलंय. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com