- फिफा वर्ल्ड कप 2026 चा भारतातील प्रसारण हक्क अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात अधिकृत घोषणा
- भारतात फुटबॉल चाहत्यांसाठी हा प्रसारण करार सुमारे 280 ते 335 कोटी रुपयांच्या दरम्यान झालाय
- या वर्ल्ड कपमध्ये 48 संघ सहभागी होतील आणि एकूण सामन्यांची संख्या 104 वर पोहोचली आहे
FIFA World Cup 2026: FIFA वर्ल्ड कप 2026 सुरू होण्यास अवघे 3 आठवडे शिल्लक आहेत. त्याच वेळी भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतात या महाकुंभाच्या प्रसारणाबाबत सुरू असलेली अनिश्चितता आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. पडद्यामागे सुरू असलेल्या प्रदीर्घ चर्चेला यश आले आहे. भारतासाठीचे प्रसारण हक्क अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. पुढील आठवड्यात याची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भारतातल्या फुटबॉल रसिकांना फिफा वर्ल्डकपचा आनंद लुटता येणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील प्रसारणाचा हा करार 30 ते 35 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 280 ते 335 कोटी रुपयांच्या दरम्यान झाला आहे. भारत ही जगातील सर्वात झपाट्याने वाढणारी क्रीडा बाजारपेठ असल्याने फिफासाठी भारताकडे दुर्लक्ष करणे व्यावसायिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. त्यामुळे ही आतापर्यंतची सर्वात मोठी डील झाल्याचं बोलले जात आहे.
यंदाचा 23 वा फिफा वर्ल्ड कप 11 जून ते 19 जुलै या कालावधीत अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमधील 16 शहरांमध्ये आयोजित केला जात आहे. यंदा पहिल्यांदाच 32 ऐवजी 48 संघ यात सहभागी होणार असून, एकूण सामन्यांची संख्या 64 वरून थेट 104 वर पोहोचली आहे. त्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि सर्वाधिक पाहिला जाणारा वर्ल्ड कप ठरेल.
भारतीय फुटबॉल संघाची आंतरराष्ट्रीय रँकिंग (पुरुष 136 आणि महिला 69) समाधानकारक नसली, तरी भारतात फुटबॉलची लोकप्रियता कमालीची आहे. 2022 च्या कतार वर्ल्ड कपदरम्यान भारतातील 74.5 कोटी लोकांनी डिजिटल आणि टीव्हीवर सामन्यांचा आनंद घेतला होता. यंदा अमेरिकेच्या टाईम झोनमुळे बहुतांश सामने भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12:30 नंतर सुरू होतील. एकूण 104 सामन्यांपैकी केवळ 14 सामने मध्यरात्रीपूर्वी पाहता येतील. असे असूनही, भारतीय क्रीडा रसिकांमधील वर्ल्ड कपची क्रेझ पाहता ब्रॉडकास्टर्सनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world