FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्ड कप 2026 च्या महामुकाबल्यात अर्जेंटिना आणि स्पेन हे दोन बलाढ्य संघ समोरासमोर आले आहेत. एकूण 48 टीमच्या सहभागासह सुरू झालेल्या या भव्य स्पर्धेची अंतिम फेरी आता न्यू जर्सी येथे होणार आहे. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीसाठी हा सामना अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा असणार आहे. वयाच्या 39 व्या वर्षी मेस्सी आपल्या कारकिर्दीतील सहाव्या वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्यांदा फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र, या फायनल मॅचला एक खास इतिहास जोडलेला आहे, कारण कारकिर्दीच्या सुरुवातीला मेस्सी अर्जेंटिनाकडून नाही, तर स्पेनकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. तेव्हा नेमकं काय घडलं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी बार्सिलोनामध्ये आगमन
स्पेन आणि मेस्सीचा हा विसरलेला इतिहास 2001 सालापासून सुरू होतो. सप्टेंबर 2001 मध्ये मेस्सी अवघ्या 13 वर्षांचा असताना बार्सिलोना क्लबच्या प्रसिद्ध 'ला माशिया' अकॅडमीमध्ये सामील होण्यासाठी स्पेनमध्ये आला होता. यानंतर त्याने तब्बल 21 वर्षे कॅटलन क्लबसोबत घालवली आणि जगातील महान फुटबॉलपटू बनण्याचा मान मिळवला.
पुढे 2021 मध्ये तो पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) क्लबमध्ये सामील झाला. कारकिर्दीतील सुरुवातीची अनेक वर्षे स्पेनमध्ये घालवूनही, मेस्सीचे स्वप्न नेहमी अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व करण्याचेच होते, ज्या निर्णयाने फुटबॉल इतिहासाला एक नवा महानायक दिला.
( नक्की वाचा : Rohit Sharma : गांगुली-चॅपल वादाची पुनरावृत्ती? रोहित शर्माच्या संभाव्य निवृत्तीचे कारण समजल्यावर बसेल धक्का )
व्हीएचएस (VHS) टेपचा तो रंजक आणि विसरलेला किस्सा
मेस्सी अर्जेंटिनामध्ये फारसा प्रसिद्ध नसताना, त्याचे वडील जॉर्ज मेस्सी यांच्या डोक्यात एक कल्पना आली. अर्जेंटिनाचा संघ जेव्हा 2002 च्या वर्ल्ड कपनंतर युरोप दौऱ्यावर बार्सिलोनामध्ये आला होता, तेव्हा जॉर्ज यांनी मेस्सीचे प्रतिनिधी होरासिओ गागिओलो यांना मेस्सीच्या खेळाचे फुटेज अर्जेंटिनाच्या प्रशिक्षकांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले. गागिओलो यांनी बार्सिलोना क्लबने दिलेली मेस्सीच्या खेळाची एक व्हीएचएस (VHS) व्हिडिओ टेप घेतली आणि अर्जेंटिनाची टीम थांबलेल्या हॉटेलमध्ये जाऊन सहाय्यक प्रशिक्षक क्लॉडिओ विवास यांची भेट घेतली.
नॉर्मल स्पीडवर चालणारी टेप पाहून प्रशिक्षक झाले थक्क
सहाय्यक प्रशिक्षक विवास यांनी ही व्हिडिओ टेप मुख्य प्रशिक्षक मार्सेलो बिएल्सा यांना दाखवली. जेव्हा बिएल्सा यांनी मेस्सीचा तो अद्भूत खेळ पाहिला, तेव्हा त्यांना विश्वासच बसेना. त्यांनी सहाय्यक प्रशिक्षकाला म्हटले की, हा व्हिडिओ नॉर्मल स्पीडवर चालव, फास्ट का केला आहे? त्यावर विवास यांनी उत्तर दिले की, हा व्हिडिओ नॉर्मल स्पीडवरच चालत आहे. मेस्सीचा तो वेगवान आणि अद्भूत खेळ पाहून बिएल्सा थक्क झाले आणि हा मुलगा खरोखरच अविश्वसनीय असल्याचे त्यांनी मान्य केले.
(नक्की वाचा : ICC World Cup: ओळखा पाहू वर्ल्ड कपचे संपूर्ण स्वरुप कुणासाठी बदलले? आयसीसीच्या निर्णयामागचं खरं गुपित उघड )
अंडर-17 वर्ल्ड कपची ती हुकलेली संधी
ही व्हिडिओ टेप जेव्हा अर्जेंटिनाचे ज्युनियर प्रशिक्षक हुगो टोकाली यांच्याकडे पोहोचली, तेव्हा 2003 च्या अंडर-17 वर्ल्ड कपची तयारी अंतिम टप्प्यात होती. त्यामुळे टोकाली यांनी मेस्सीला संघात स्थान दिले नाही. या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाला स्पेनकडून 3-2 ने पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यानंतर स्पेनच्या स्टाफमधील एका सदस्याने टोकाली यांना सांगितले होते की, तुमच्या टीममध्ये मेस्सी असता, तर आज अर्जेंटिनाने स्पेनला नक्कीच हरवले असते.
स्पेनकडून मोठी ऑफर आणि मेस्सीचा ऐतिहासिक निर्णय
मेस्सीच्या या खेळावर स्पेनचीही पूर्ण नजर होती. त्याचे प्रतिनिधी गागिओलो यांनी सांगितले की, मेस्सीने स्पेनच्या राष्ट्रीय संघाकडून खेळावे म्हणून त्यांना स्पेनमधून अनेक फोन येत होते. मात्र, मेस्सी आणि त्याच्या कुटुंबाचा निर्णय पक्का होता. मेस्सीला स्पेनकडून खेळण्यासाठी मोठी ऑफर आणि प्रचंड उत्सुकता असतानाही, त्याने आपल्या मातृभूमीला म्हणजेच अर्जेंटिनाला प्राधान्य दिले.
अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनची धावपळ
स्पेनच्या गोटातून मेस्सीसाठी होणाऱ्या हालचाली पाहून अर्जेंटिनाचे प्रशिक्षक टोकाली सतर्क झाले. हा हिरा आपल्या हातातून निसटू नये म्हणून त्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. मेस्सीला अर्जेंटिनाचा खेळाडू म्हणून अधिकृत शिक्कामोर्तब करण्यासाठी अर्जेंटिनाने घाईघाईत एका ज्युनियर मैत्रीपूर्ण सामन्याचे आयोजन केले. अगदी कमी वेळ असल्याने या सामन्यासाठी फिफाच्या नियमांनुसार आवश्यक असलेला मान्यताप्राप्त अर्जेंटिनाचाच पंच (रेफ्री) आणण्यात आला होता. या सामन्यात खेळून मेस्सीने स्पेनकडून खेळण्याच्या सर्व शक्यता कायमच्या संपवल्या आणि अर्जेंटिनाचा फुटबॉल इतिहास बदलून टाकला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world