Gautam Gambhir Head Coach: गौतम गंभीर भारतीय क्रिकेट टीमचा हेड कोच बनला आहे. T20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ समाप्त झाला. द्रविडनं टीम इंडियाला आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद मिळवून देत त्याच्या कारकिर्दीचा समारोप केला. द्रविडनंतर टीमला पुढं नेण्याची जबाबदारी गंभीरच्या खांद्यावर आलीय.
कधीही हार न मानणाऱ्या वृत्तीसाठी गंभीर ओळखला जातो. स्वत:च्या तत्वांनी काम करण्याची गंभीरची पद्धत आहे. आता क्रिकेट विश्वातील सर्वात आव्हानात्मक काम तो कसं करतो याची सर्वांना उत्सुकता आहे. गंभीरच्या कॅप्टनसीमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं दोन वेळा आयपीएल विजेतेपद जिंकलं होतं. तो यंदा केकेआरचा मेंटॉर बनला. आयपीएल 'प्ले ऑफ' मध्ये जाण्यासाठी झगडणाऱ्या केकेआरचा गंभीरनं कायापालट केला. त्याच्या मार्गदर्शनाखाली केकेआरनं यंदा तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं.
भारतीय टीमचा हेड कोच म्हणून गंभीरचा कार्यकाळ श्रीलंका दौऱ्यापासून सुरु होणार आहे. गौतम गंभीरसमोर नव्या जबाबदारीमध्ये 5 प्रमुख आव्हानं आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वरिष्ठ खेळाडूंसोबत समन्वय
गौतम गंभीरला वरिष्ठ खेळाडूंसोबत समन्वय ठेवावा लागेल. भारतीय टीमममध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, अश्विन, जाडेजा हे सिनिअर खेळाडू आहेत. यापैकी रोहित वन-डे आणि टेस्ट टीमचा कॅप्टन आहे. या सर्व खेळाडूंशी योग्य समन्वय साधण्याबरोबरच त्यांचा पर्याय शोधण्याचं काम गंभीरला करावं लागेल. तरुण खेळाडूंना मॅचविनर म्हणून घडवण्याची जबाबदारी गंभीरवर असेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद
2025 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावणे हे गंभीरसमोरचं मोठं आव्हान आहे. भारतीय टीमनं 2002 आणि 2013 साली या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. तर 2016 साली टीम इंडियाचा फायनलमध्ये पराभव झाला. आता 9 वर्षांनी आयसीसीची ही स्पर्धा पुन्हा एकदा होणार आहे. पुढच्या वर्षी होणारी ही स्पर्धा कोच गंभीरसाठी अग्नीपरीक्षा आहे.
( नक्की वाचा : अखेर शिक्कामोर्तब! गौतम गंभीर बनला टीम इंडियाचा हेड कोच )
WTC चॅम्पियनशिप
भारतीय क्रिकेट टीमला दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं विजेतेपद मिळवण्यात अपयश आलंय. पहिल्यांदा न्यूझीलंडनं तर दुसऱ्यावेळी ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा फायनलमध्ये पराभव केला. आता 'गुरु गौतम'वर टीमला या स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्याचं आव्हान आहे. 2025 मध्ये या स्पर्धेची फायनल होणार आहे. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजचा अडथळा आहे. गंभीरसमोर ऑस्ट्रेलियात विजयाची हॅटट्रिक मिळवून देण्याचं काम करावं लागेल.
T20 वर्ल्ड कप 2026
पुढचा टी20 वर्ल्ड कप 2026 साली होणार आहे. गंभीरला कोच म्हणून या स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्याची जबाबदारी असेल. भारतानं यंदा ही स्पर्धा जिंकलीय. आता गंभीरला विजेतेपद राखण्याची जबाबदारी आहे.
( नक्की वाचा : कोण आहे स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल? दोघांमध्ये किती आहे वयाचं अंतर, कुणाची कमाई जास्त? )
2027 वन-डे वर्ल्ड कप
वन-डे वर्ल्ड कप 2027 साली होणार आहे. गंभीर या स्पर्धेपर्यंत भारतीय टीमचा कोच असेल. टीम इंडिया 2023 साली या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचली होती. पण विजेतेपद पटकावू शकली नाही. आता गंभीरला वन-डे वर्ल्ड कप जिंकावा लागेल, भारतानं यापूर्वी 1983 आणि 2011 साली वन-डे वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं आहे.
गौतम गंभीरच्या कोचिंग करिअरमधील प्रमुख सीरिज
2025 - ऑस्ट्रेलियामधील 5 टेस्ट
2025 - चॅम्पियन्स ट्रॉफी
2025 - WTC फायनल
2025 - इंग्लंडमधील 5 टेस्ट
2026 - T20 वर्ल्ड कप
2026 - न्यूझीलंडमधील 2 टेस्ट
2027 - WTC फायनल
2027 - वन-डे वर्ल्ड कप