Gautam Gambhir on MS Dhoni: टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आणि टीम इंडियाचा सध्याचा हेड कोच गौतम गंभीर यांच्यातील मैदानाबाहेरील नातं नेहमीच चर्चेचा विषय असतं. अनेकदा त्यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगतात, पण नुकत्याच कोलकाता येथे झालेल्या एका कार्यक्रमात गौतम गंभीरने असं काही विधान केलं आहे, ज्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ माजली आहे. भारतीय टीमचा हेड कोच म्हणून सलग दोन आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या गंभीरने चक्क महेंद्रसिंह धोनीला भारतीय टीमचा पुढचा हेड कोच म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
नेमकं काय घडलं?
गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय टीमने गेल्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आता 2026 चा टी20 वर्ल्ड कप जिंकून जगभरात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. विशेष म्हणजे, खेळाडू आणि कोच अशा दोन्ही भूमिकांमध्ये आयसीसी बाद फेरीचा एकही सामना न हरण्याचा विक्रम गंभीरच्या नावावर जमा झाला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून ब्रेक मिळाल्याने गंभीर कोलकात्यात एका कार्यक्रमासाठी आला होता, जिथे त्याने धोनीबद्दल मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली.
( नक्की वाचा : T20 वर्ल्ड कप जिंकला तरी Gautam Gambhir संतापलेलाच? म्हणाला, 'त्या' 30 लोकांशिवाय मला कोणाचं देणंघेणं नाही! )
धोनीने सोशल मीडियावर गंभीरच्या हसण्यावरून एक कमेंट केली होती, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर धोनीने इन्स्टाग्रामवर टीमचं अभिनंदन केलं होतं. त्या पोस्टमध्ये धोनीने गमतीने म्हटलं होतं की, ट्रॉफी जिंकल्यानंतर गौतम गंभीरच्या चेहऱ्यावर थोडं हसू पाहून त्याला खूप आनंद झाला. यावर प्रतिक्रिया देताना गंभीरने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल मॅच पाहायला आल्याबद्दल धोनीचे आभार मानले आणि हसण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल त्याचं कौतुकही केलं.
काय म्हणाला गंभीर?
यावेळी बोलताना गंभीरने एक मोठं विधान केलं. तो म्हणाला की, धोनीने फायनल बघायला येणं आणि मला हसायला सांगणं हे खूप चांगलं होतं. पण मला मनापासून असं वाटतं की, एक दिवस धोनीने माझ्या जागी (भारतीय टीमचा हेड कोच म्हणून) असावं. ज्या दिवशी धोनी डगआऊटमध्ये कोच म्हणून बसलेला असेल, त्या दिवशी मी सुद्धा त्याच्यासाठी असंच काहीतरी लिहीन आणि तो डगआऊटमधून हसताना मला पाहायला आवडेल. गंभीरच्या या विधानामुळे भविष्यात धोनी भारतीय टीमच्या कोचच्या भूमिकेत दिसणार का, अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.
🗣️ Gautam Gambhir opens up on his viral exchange with MS Dhoni:
— RevSportz Global (@RevSportzGlobal) March 16, 2026
“This smile is for him” pic.twitter.com/x4T9oUbjQq
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world