ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर भारतीय खेळाडू तसंच हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यावर काही कठोर निर्बंध लादण्याचा विचार बीसीसीआय (BCCI) करत आहे. याबाबतच्या रिपोर्टनुसार विदेश दौऱ्यात भारतीय खेळाडू कुटुंबासोबत दीर्घकाळ राहिले तर त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो, असं बीसीसीआयचं मत झालं आहे. त्यामुळे खेळाडूंसोबत त्यांची पत्नी आणि कुटुंब राहण्यासाठी 2019 पूर्वीची मर्यादा निश्चित करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या विषयावर दैनिक 'जागरण' नं दिलेल्या वृत्तानुसार क्रिकेटपटूंच्या पत्नी विदेश दौऱ्यातील संपूर्ण कालावधी त्यांच्यासोबत राहू शकणार नाहीत. विराट कोहली, रोहित शर्मा या दिग्गज क्रिकेटपटू त्यांच्या कुटुंबीयांसह विदेश दौऱ्यातील संपूर्ण कालावधीमध्ये त्यांच्यासोबत असतात. बीसीसीआयचा हा निर्णय त्यांना धक्का मानला जात आहे.
नव्या नियमानुसार 45 दिवसांचा विदेश दौरा असेल तर टीम इंडियातील खेळाडूंना दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ पत्नीसोबत राहता येणार नाही. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूला टीमच्या बसमधूनच प्रवास करावा लागणार आहे. त्यांना वेगळा प्रवास करण्यास परवानगी मिळणार नाही, असा निर्णयही बीसीसीआय घेण्याच्या तयारीत आहे.
( नक्की वाचा : Team India : 6 महिने मिळत नव्हती कुठं संधी, आता 664 ची सरासरी! टीम इंडियात होणार निवड? )
गंभीरलाही धक्का
बीसीसीआय टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरच्या स्वातंत्र्यावरही निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. या रिपोर्टनुसार गौतम गंभीरचा मॅनेजर गौरव अरोराला टीमच्या हॉटेलमध्ये राहता येणार नाही. त्याचबरोबर त्याला स्टेडियममधील VIP बॉक्समध्ये बसण्यासही निर्बंध असतील. त्याचबरोबर त्याला टीमसोबत बसमध्ये किंवा टीमच्या मागे प्रवास करण्यासही परवानगी नसेल.
हवाई प्रवासाच्या दरम्यान खेळाडूंनी 150 किलोपेक्षा जास्त वजनाचे सामान नेऊ नये, असे निर्देश बीसीसीआयनं दिले आहेत. त्यापेक्षा जास्त वजन असेल तर त्याचा खर्च खेळाडूंना स्वत: करावा लागेल. टीम इंडियाचा टेस्ट आणि वन-डे टीमचा कॅप्टन रोहित शर्मा, हेड कोच गौतम गंभीर, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर तसंच बीसीसीआयचे नवनियुक्त सचिव आणि खजिनदार यांची शनिवारी (11 डिसेंबर) बैठक झाली. या बैठकीत या सर्व मुद्यांवर चर्चा झाली.