T20 वर्ल्ड कपमधून पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलंय. पाकिस्ताननं आयसीसी स्पर्धेत भारताकडून पराभूत होण्याची परंपरा पाळली. त्याचवेळी पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या अमेरिकेकडूनही त्यांचा पराभव झाला. या दोन पराभवानंतर पाकिस्तानची टीम सुपर 8 पूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडलीय. पाकिस्तान क्रिकेट टीमच्या कामगिरीवर सध्या सर्वत्र टीका होत आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमचे कोच गॅरी कर्स्टन देखील यामुळे नाराज आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
पाकिस्तानी खेळाडूंमध्ये एकजूट नाही. ते खेळाडू एकत्र खेळत असले तरी एकमेकांना पाठिंबा देत नाहीत, असं मत गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केल्याची बातमी पाकिस्तानी मीडियानं सूत्रांच्या हवाल्यानं दिली होती. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर याचे सोशल मीडियावर जोरदार पडसाद उमटले. टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंगनं देखील या बातमीची दखल घेत कर्स्टन यांना जाहीर सल्ला दिला.
ट्रेंडींग बातमी - बांगलादेशच्या खेळाडूनं Live मॅचमध्ये केली चीटिंग, अंपायर पाहातच राहिले
गॅरी कर्स्टन यांनी वेळ वाया घालवू नये. भारतामध्ये येऊन कोचिंग करावं, असा सल्ला हरभजननं दिलाय. गॅरी कर्स्टन एक ग्रेट कोच, मेंटॉर असून 2011 मधील विश्वकप विजेत्या भारतीय टीमचे कोच आहेत, याची आठवणही हरभजननं करुन दिलीय.
हरभजनचा हा जाहीर सल्ला त्याचाच टीममधील माजी सहकारी गौतम गंभीरला आवडला नसावा, अशी चर्चा आता सुरु झालीय. कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर असलेल्या गौतम गंभीरचं नाव भारतीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. T20 वर्ल्ड कपनंतर विद्यमान प्रक्षिक्षक राहुल द्रविडची मुदत संपणार आहे. द्रविडच्या जागी गंभीरची निवड होईल असं मानलं जातंय. त्यातच हरभजननं कर्स्टन यांना हा सल्ला दिलाय.