४० सुवर्ण, ४४ रौप्य आणि ४२ कांस्यपदकांसह १२६ पदकं मिळवत अमेरिकेने नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अव्वल स्थान पटकावलं. अमेरिकेचा तगडा प्रतिस्पर्धी मानला जाणारा चीनही ९१ पदकांसह दुसऱ्या स्थानी राहिला. सुवर्णपदकांच्या शर्यतीत चीनने अमेरिकेला ४० पदकं मिळवत बरोबरीत गाठलं खरं परंतु रौप्य आणि कांस्य पदकाच्या शर्यतीत अमेरिका अव्वल ठरल्यामुळे त्यांना पहिला क्रमांक मिळाला.
अमेरिका देशाचं नाव घेतलं की पहिला शब्द समोर येतो तो म्हणजे महासत्ता. गेल्या काही वर्षांपासून अमेरिका ऑलिम्पिक स्पर्धेतही आपली महासत्ता शाबुत ठेवून आहे. ऑलिम्पिक स्पर्धा समोर आली की भारतात प्रत्येक चार वर्षांनी एक चर्चा ऐकायला मिळते ती म्हणजे...आपण कधी तिथपर्यंत पोहचणार. परंतु क्रीडा क्षेत्रात होणारी पायाभूत गुंतवणूक, खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि यश मिळवण्यासाठी हरएक प्रकारे प्रयत्न करण्याची जिद्द अमेरिका, चीन यासारख्या देशांमध्ये दिसून येते. गरज पडेल तिकडे कठोर तर जिकडे गरज पडेल तिकडे मानसिक आधार देण्यासाठी अमेरिकेसारखा देश ज्या पद्धतीने प्रयत्न करतो ते पाहता त्यांना मिळणाऱ्या पदकाचं आश्चर्य वाटायला नको.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पार पडलेल्या जिमनॅस्टिक स्पर्धांमध्ये अमेरिकेच्या महिला संघाने ८ पदकं मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. काही वर्षांपूर्वी टोकियो येथे झालेल्या स्पर्धेत अमेरिकन महिल संघाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. सिमॉन बिल्स, सुनीसा ली, जॉर्डन चिल्स, जेड कॅरी आणि हेझली रिव्हेरा या पाच अमेरिकन महिलांचा यंदाच्या जिमनॅस्ट स्पर्धेमध्ये दबदबा पहायला मिळाला. परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल अमेरिकन महिलांच्या या यशामध्ये एका कुत्र्याचा मोठा हिस्सा आहे. अमेरिकन महिला संघाला मानसिक आधार देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चार वर्षांच्या गोल्डन रिट्रीव्हर जातीच्या 'बेकन' या कुत्र्याची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बेकन हा कुत्रा गेली वर्षभर या महिला संघाच्या सोबत वावरत आहे. खेळाडूंना येणारा ताण आणि शरिरातील सेरोटॉनिन चं प्रमाण नियंत्रणात रहावं यासाठी या कुत्र्याची नियुक्ती करण्यात आली होती. सेरोटॉनिन हे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात असणारं एक केमिकल असतं. प्रत्येक व्यक्तीची झोप, पचनसंस्था, लैंगिक इच्छा, जखम भरण्याची क्षमता, हाडांचं आरोग्य हे सर्व घटक नियंत्रणात रहावे यासाठी सेरोटॉनिन हे महत्वाची भूमिका बजावतं.
काय आहे या 'बेकन' ची कहाणी?
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील पॅसेडीना शहरात गोल्डन रिट्रीव्हर जातीचा बेकन हा Emotional Support Dog म्हणून काम करतो. याआधी अमेरिकेतील Minneapolis येथे अमेरिकन ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा पार पडली. त्यावेळी 'बेकन'कडे कोच आणि खेळाडूंचं मानसिक आरोग्य चांगलं रहावं याची जबाबदारी होती. प्रत्येक खेळाडूला मैदानात येण्याआधी शरिरात एका प्रकारची उत्सुकता असते. अनेकदा या उत्सुकतेपोटी खेळाडूंची कामगिरी बिघडते. यावर नियंत्रण येण्याकरता पात्रता फेरीत अनेक कुत्र्यांना बोलावण्यात आलं होतं. ज्यात बेकनचाही समावेश होता. त्यावेळी पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड न झालेल्या खेळाडूंसोबत काही काळ बेकन राहिला होता.
अल्पावधीतच बेकनची प्रसिद्धी स्थानिक श्वानप्रेमी ग्रुप आणि खेळाडूंमध्ये पसरली. ज्यानंतर त्याची अमेरिकन महिला जिमनॅस्ट संघासोबत नियुक्ती करण्यात आली. ८ पदकं जिंकल्यानंतर अमेरिकन महिला संघातील सुनीसा ली ने बेकनसोबत आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत, देवाचे आभार मानले आहेत.
हे ही वाचा - BLOG : पॅरिसच्या 6 पदकांनी करुन दिली खडतर भविष्याची जाणीव
अमेरिकन खेळाडूंना अजुन कोणाची मदत मिळाली?
खेळाडूंचं मानसिक आरोग्य चांगलं रहावं यासाठी बेकन या कुत्र्याची निवड करणं हा अमेरिकेच्या जिमनॅस्ट असोसिएशनच्या अनेक निर्णयांपैकी एक निर्णय होता. याव्यतिरीक्त खेळाडूंसाठी तज्ज्ञ थेरपिस्टचीही नियुक्ती करण्यात आली होती.
बेकन हा अमेरिकेतील Rhythmic Gymnastics च्या माजी प्रशिक्षक ट्रेसी कॉलहन मोल्नर यांच्यासोबत राहत आला आहे. बेकनची सर्व जबाबदारी त्याच पाहतात. एखाद्या खेळाडूला जर मानसिक आधाराची गरज असेल तर बेकनला ते लगेच कळतं आणि तो त्यांच्यापाशी जाऊन थांबतो. ज्याचा खेळाडूंना खूप फायदा झाल्याचं मोल्नर यांनी ESPN शी बोलताना सांगितलं.
अमेरिकेत जिमनॅस्ट संघासाठी पार पडलेल्या पात्रता फेरीतही मोठा ड्रामा पार पडला. शिलीस जोन्स, स्काय ब्लॅकली आणि कायला डिकेलो या तीन जिमनॅस्टपटूंना मोठी दुखापत झाली. या तिन्ही खेळाडूंची संघात निवड पक्की मानली जात असतानाच ही दुखापत झाली. मोल्नर यांनी या खेळाडूंचीही विशेष काळजी घेत त्यांच्यासोबत बेकनला वेळ घालवायला संधी दिली. संधी हुकलेल्या तिन्ही खेळाडूंसोबत बेकनने दर दिवशी ४० मिनीटं वेळ घालवत त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घेतली.