'तुम्हाला मला निवडावंच लागेल', IPL गाजवणाऱ्या भारतीय खेळाडूचं मोठं वक्तव्य

IPL 2024 गाजवणाऱ्या तरुण भारतीय खेळाडूनं माझी टीम इंडियात नक्की निवड होईल, असा विश्वास व्यक्त केलाय.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

आयपीएल (IPL 2024) संपताच क्रिकेट विश्वाला टी20 वर्ल्ड कपचे (T20 World Cup 2024) वेध लागले आहेत. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रमुख खेळाडू रवाना झाले आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये गुणवान खेळाडूंची कमतरता नाही. आयपीएल तसंच इतर देशांतर्गत स्पर्धेत दमदार कामगिरी करत अनेक तरुण खेळाडू टीम इंडियाचं दार ठोठावत आहेत. या अटीतटीच्या स्पर्धेत भारताच्या एका तरुण खेळाडूनं माझी टीममध्ये नक्की निवड होईल, असा विश्वास व्यक्त केलाय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आयपीएल 2024 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या रियान परागनं मी टीम इंडियाकडून नक्की खेळेल हा विश्वास व्यक्त केलाय. 'काहीही झालं तरी मी भारताकडून नक्की खेळेल' असं परागनं सांगितलं. परागनं यंदाच्या आयपीएल सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना जवळपास 150 च्या स्ट्राईक रेटमध्ये 573 रन केले. या सिझनमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यानं 16 सामन्यात चार हाफ सेंच्युरी लगावल्या आहेत. राजस्थान रॉयल्सला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहचवण्यात परागची भूमिका महत्त्वाची होती.

रेकॉर्डब्रेक सिझन

2018 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकलेल्या रियान परागला मागील पाच आयपीएल सिझनमध्ये समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतरही राजस्थान रॉयल्सनं त्याच्यावर विश्वास कायम ठेवला. त्याला या सिझनमध्ये चौथ्या क्रमांकावर बढती दिली. राजस्थानची ही चाल यशस्वी ठरली. मागील पाच सिझनमध्ये एकदाही परागला 200 रनचा टप्पा ओलांडता आला नव्हता. या सिझनमध्ये त्यानं 573 रन केले. 

( नक्की वाचा : IPL 2024 : KKR च्या यशाचं मुंबई कनेक्शन, 3 मुंबईकरांशिवाय अशक्य होतं विजेतेपद! )
 

परागनं पीटीआयशी बोलताना सांगितलं की, 'कधी ना कधी त्यांना माझी निवड करावीच लागेल. मी भारताकडून खेळेल हा मला विश्वास आहे. मी कधी खेळणार हे माहिती नाही.' 

Advertisement

परागनं बुधवारी सांगितलं की, 'मी रन करत नव्हतो तेव्हा देखील एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की मी भारताकडून नक्की खेळेल. माझा स्वत:वर विश्वास आहे. हा अहकांर नाही. मी वयाच्या 10 व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरु केलं होतं. त्याचवेळी माझ्या वडिलांनी (रेल्वे आणि आसामचे माजी खेळाडू पराग दास) यांनी माझ्यासोबत हे प्लॅनिंग केलं होतं. 

( नक्की वाचा : 5 कारणांमुळे गौतम गंभीर होऊ शकतो टीम इंडियाचा कोच )
 

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी होणार निवड?

रियान पराग, अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा यांची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड केली जाईल अशी शक्यता आहे. परागनं सांगितलं की, 'ही पुढची सीरिज असेल की सहा महिन्यानंतर अथवा वर्षभरानंतरची सीरिज असेल याचा मी विचार केलेला नाही. हे निवड समितीचं काम आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय टीम पाच आंतररष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेला जाणार आहे. 
 

Advertisement