ICC World Cup : आयसीसी बदलणार वनडे आणि टी20 वर्ल्ड कपचा संपूर्ण फॉरमॅट, जाणून घ्या काय आहे नवा खेळ

ICC World Cup : आयसीसीने आगामी पुरुष एकदिवसीय म्हणजेच वनडे वर्ल्ड कप आणि टी20 वर्ल्ड कपच्या फॉर्मेटमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
ICC World Cup : आयसीसीनं वर्ल्ड कपचा संपूर्ण फॉरमॅट बदलला आहे.
मुंबई:

ICC World Cup :  क्रिकेटच्या मैदानावर प्रेक्षकांचा थरार आणि उत्साह आणखी वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आयसीसीने आगामी पुरुष एकदिवसीय म्हणजेच वनडे वर्ल्ड कप आणि टी20 वर्ल्ड कपच्या फॉर्मेटमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. आता वनडे वर्ल्ड कपचा थरार तीन टप्प्यांमध्ये पाहायला मिळणार आहे, तर टी20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या टप्प्यात संघ आणि सामन्यांची संख्या वाढवून तो अधिक रंजक केला जाणार आहे. 

एडिनबर्ग येथे झालेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समितीने केलेल्या शिफारसींनुसार या बदलांना मंजुरी देण्यात आली आहे. खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना सामन्यांचा एक नवा आणि दर्जेदार अनुभव मिळावा, हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.

Advertisement

वनडे वर्ल्ड कप आता तीन टप्प्यांत रंगणार

आगामी पुरुष वनडे वर्ल्ड कपमध्ये 14 संघ खेळणार असले, तरी या स्पर्धेचा फॉरमॅट आता पूर्णपणे बदलणार आहे. अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी संघांना तीन वेगवेगळ्या टप्प्यांतून जावे लागेल. यामध्ये सर्वात कमी रँकिंग असलेले शेवटचे 3 संघ (रँक 12, 13 आणि 14) सुरुवातीला 'सुपर सिरीज' नावाच्या पहिल्या राउंडमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतील. यातून केवळ 1 सर्वोत्तम संघ मुख्य फेरीत प्रवेश करेल.

दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच राउंड 2 मध्ये एकूण 12 संघ असतील. या 12 संघांची 6-6 अशा दोन ग्रुपमध्ये विभागणी केली जाईल. प्रत्येक ग्रुपमधील टॉप 3 संघ आणि दोन्ही ग्रुपमधील रँकिंगनुसार पुढचा सर्वोत्तम कामगिरी करणारा 1 संघ, असे एकूण 7 संघ 'सुपर 7' नावाच्या पुढील टप्प्यात पोहोचतील. या 'सुपर 7' टप्प्यामध्ये राउंड-रॉबिन पद्धतीने सामने खेळवले जातील आणि त्यातील टॉप 4 संघ थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.

( नक्की वाचा : Lionel Messi: सेमीफायनलच्या लढतीपूर्वी मेस्सी पिणार 'तो' खास चहा? वाचा काय आहे ते सिक्रेट कनेक्शन )
 

टी20 वर्ल्ड कपमध्ये आता सुपर 10 चा थरार

गेल्या काही टी20 वर्ल्ड कपमध्ये नवोदित देशांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आयसीसीने 20 संघांच्या या स्पर्धेतही मोठे बदल केले आहेत. आता टी20 वर्ल्ड कपचा दुसरा टप्पा 8 संघांऐवजी 10 संघांचा म्हणजेच 'सुपर 10' असणार आहे. सुरुवातीच्या ग्रुप स्टेजमध्ये आता 4-4 संघांचे 5 ग्रुप केले जातील, ज्यामध्ये एकूण 30 सामने होतील. यापूर्वीच्या फॉरमॅटमध्ये 5-5 संघांचे 4 ग्रुप असायचे.

नव्या नियमानुसार, प्रत्येक ग्रुपमधील टॉप 2 संघ म्हणजेच एकूण 10 संघ 'सुपर 10' टप्प्यात पोहोचतील. या 'सुपर 10' मध्ये 5-5 संघांचे दोन ग्रुप असतील. येथून नॉकआउटची पद्धतही बदलली आहे. आता सुपर 10 च्या दोन्ही ग्रुपमधील फक्त अव्वल 1 संघ थेट सेमीफायनलसाठी पात्र ठरेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहणारे संघ उर्वरित 2 सेमीफायनल जागांसाठी एकमेकांविरुद्ध 'एलिमिनेटर' सामना खेळतील. या नव्या एलिमिनेटर पद्धतीमुळे शेवटच्या सामन्यापर्यंत प्रचंड चुरस पाहायला मिळणार आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीनं टीम इंडियाच्या जर्सीसाठी 3 नंबर का निवडला? खास कारण झालं उघड )
 

टी20 वर्ल्ड कप 2028 चा रोडमॅप तयार

आयसीसीने 2028 मधील टी20 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्याच्या प्रक्रियेचा रोडमॅप देखील जाहीर केला आहे. यामध्ये स्कॉटलंड संघाला युरोप रिजनल फायनलमध्ये थेट प्रवेश देण्यात आला आहे. 2026 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये अचानक बांगलादेशच्या जागी खेळण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी हा विशेष निर्णय घेण्यात आला आहे.

इतर जे संघ थेट पात्र ठरू शकणार नाहीत, ते ग्लोबल क्वालिफायरमध्ये खेळतील. यामध्ये आफ्रिका, आशिया आणि युरोपमधून प्रत्येकी 2 संघ, तर अमेरिका आणि ईस्ट आशिया-पॅसिफिकमधून प्रत्येकी 1 संघ असे एकूण 8 रिजनल क्वालिफायर संघ सामील होतील. या सर्वांमधून सर्वोत्तम कामगिरी करणारे संघ 2028 च्या मुख्य वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

Advertisement

नोव्हेंबरच्या बैठकीत अंतिम निर्णय

जरी या संपूर्ण नव्या फॉरमॅटला आणि रोडमॅटला आयसीसी बोर्डाने मंजुरी दिली असली, तरी या मोठ्या बदलांवर शेवटचा निर्णय नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. या बैठकीत आर्थिक आणि व्यावसायिक बाबींची पडताळणी करणारी समिती या नव्या नियोजनाचा आढावा घेईल आणि त्यानंतर यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.
 


Topics mentioned in this article