
India vs England 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर सुरु असलेली तिसरी टेस्ट सध्या रंगतदार वळणावर आहे. या टेस्टमध्ये इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये 387 रन्स केले. जो रुटची सेंच्युरी हे इंग्लंडच्या इनिंगचं वैशिष्ट्य होतं. तर भारताकडून जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) त्याचा फॉर्म कायम राखत 5 विकेट्स घेतल्या होत्या.
सचिन विराटला जमलं नाही पण....
टीम इंडियानंही पहिल्या इनिंगमध्ये चांगला प्रतिकार केला आहे. भारताकडून केएल राहुलनं सेंच्युरी झळकावली. राहुलनं 177 बॉलमध्ये 13 फोरच्या मदतीनं 100 रन काढले. राहुल आणि ऋषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी 141 रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली. या सीरिजमध्ये फॉर्मात असलेले यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल स्वस्तात आऊट झाल्यानंतरही राहुलनं पंतच्या मदतीनं टीम इंडियाची इनिंग सावरली.
राहुलचं ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर ही दुसरी टेस्ट सेंच्युरी आहे. त्यानं यापूर्वी 2021 मध्ये लॉर्ड्स टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली आहे. क्रिकेट विश्वात 'लॉर्ड्स' ला विशेष महत्त्व आहे.या ऐतिहासिक मैदानात सेंच्युरी झळकावण्याचं प्रत्येक क्रिकेटपटूंचं स्वप्न असतं. पण, सर्वांचंच ते स्वप्न पूर्ण होत नाही.
( नक्की वाचा : IND vs ENG: शुबमन गिल अंपायरवर चिडला, गावस्करही संतापले! लॉर्ड्स टेस्टमध्ये भर मैदानात मोठा राडा )
अगदी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन्स आणि सेंच्युरी करणाऱ्या सचिन तेंडुलकरलाही लॉर्ड्स टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावता आली नाही. टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं टेस्टमध्ये 9000 रन्स केले. पण, तो देखील लॉर्ड्सवर सेंच्युरी झळकावण्यात अपयशी ठरला. सचिन आणि विराट सारख्या महान बॅटरला जे एकदाही जमलं नाही ते केएल राहुलनं दोनदा केलं आहे.
35 वर्ष जुना रेकॉर्ड मोडणार?
लॉर्ड्सवर 2 वेळा टेस्ट सेंच्युरी झळकावणारा केएल राहुल हा दुसरा भारतीय आहे. यापूर्वी दिलीप वेंगसरकर यांनी लॉर्ड्सवर तीन टेस्ट सेंच्युरी झळकावल्या आहेत. वेंगसरकर यांनी 1979 ते 1990 या कारकीर्दीमध्ये लॉर्ड्सवर तीन वेळा टेस्ट सेंच्युरी झळकावली. वेंगसरकर यांनी 4 टेस्टमध्ये 3 वेळा सेंच्युरी केली होती.
केएल राहुलनं आत्तापर्यंत तिसऱ्याच टेस्टमध्ये दोन सेंच्युरी झळकावल्या आहेत. या टेस्टची आणखी एक इनिंग बाकी आहे. त्यामुळे त्या इनिंगमध्ये राहुलनं सेंच्युरी झळकावली तर त्याला वेंगसरकरपेक्षा कमी टेस्टमध्ये लॉर्ड्सवर तीन सेंच्युरी झळकावण्याचा रेकॉर्ड करण्याची संधी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world