Ahmedabad Narendra Modi Stadium Pitch Report : न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 वर्ल्ड कप फायनलसाठी आता अवघा काही वेळ उरला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या महामुकाबल्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या हाय व्होल्टेज मॅचसाठी वापरण्यात येणारी खेळपट्टी कशी असेल, याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. टीम इंडियाने या पिचच्या तयारीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असून, फायनलसाठी मिक्स्ड सॉईल म्हणजेच मिश्र मातीची खेळपट्टी वापरली जाणार आहे.
मैदानातील मधल्या खेळपट्टीवर फायनल मॅच होणार असल्याचे समजते. या पिचवर लाल आणि काळी अशा दोन्ही प्रकारच्या मातीचा वापर करण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या सेमी फायनलच्या खेळपट्टीसारखीच ही खेळपट्टी असू शकते.
सेमी फायनलमध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध 253/7 असा डोंगरासारखा स्कोअर उभा केला होता. संजू सॅमसनने त्या मॅचमध्ये 89 रनची वादळी खेळी केली होती. आता फायनलमध्येही तसाच काहीसं होण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : IND vs NZ Final:पावसामुळे फायनल रद्द झाली तर कुणाला मिळणार वर्ल्ड कप? पाहा फायनलचे 5 महत्त्वाचे नियम )
पिचमध्ये नेमका काय बदल असेल?
अहमदाबादच्या या खेळपट्टीवर काळ्या मातीपेक्षा लाल मातीचे प्रमाण जास्त ठेवण्यात आले आहे. लाल माती जास्त असल्यामुळे बॅटर्सना चांगला फायदा मिळतो. या पिचवर चेंडूला चांगला बाऊन्स मिळेल आणि बॅटवर बॉल व्यवस्थित येईल, अशी अपेक्षा आहे.
या मैदानात आतापर्यंत झालेल्या सामन्यांचा विचार केला तर 200 रनचा आकडा पार करणे सहज शक्य दिसते. दक्षिण आफ्रिकेने याच मैदानावर कॅनडाविरुद्ध 213 रन केले होते. त्यामुळे फायनलमध्ये पुन्हा एकदा रन्सचा पाऊस पडू शकतो.
लाल मातीलाच पसंती का?
भारताने याआधी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये काळ्या मातीच्या खेळपट्टीवर हार पत्करली आहे. 2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत काळ्या मातीच्या खेळपट्टीवर खेळला होता. ती खेळपट्टी नंतर धिमी झाली होती आणि भारताला पराभवाचा धक्का बसला होता.
तसेच सध्या सुरु असलेल्या T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेला पराभवही टीम इंडियासाठी डोळे उघडणारा ठरला होता. त्यामुळेच फायनलसाठी लाल मातीचे प्रमाण जास्त असलेल्या 'स्पोर्टिंग पिच'ची निवड करण्यात आली आहे, जिथे कुणा एकालाच झुकते माप मिळणार नाही.
क्युरेटर्ससोबत टीम इंडियाची चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघ व्यवस्थापन साखळी फेरीतील काही खेळपट्ट्यांबाबत समाधानी नव्हते. मॅनेजमेंटने स्थानिक क्युरेटर्सकडे आपली नाराजी व्यक्त केली होती.
इतकेच नाही तर पिचच्या तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी संघाने आपल्या कर्मचाऱ्यांनाही पाठवले होते. भारताला आपल्या आक्रमक बॅटिंगच्या जोरावर न्युझीलंडला नमवायचे आहे, त्यासाठी अशा प्रकारची खेळपट्टी अत्यंत पूरक ठरणार आहे.
संजू सॅमसन आणि सूर्यकुमारची रणनीती
भारताने या संपूर्ण स्पर्धेत आक्रमक खेळ करण्याची रणनीती आखली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया रिस्क घेऊन मोठे शॉट खेळण्यावर भर देत आहे. संजू सॅमसनच्या समावेशामुळे मिडल ऑर्डरला मजबुती मिळाली आहे.
फायनलमध्ये सुरुवातीला बॉल स्विंग झाला, तर संजूचा काउंटर अटॅक भारतासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. न्युझीलंडने या मैदानात एक सामना खेळला आहे, तर भारताने दोन सामने खेळले आहेत. त्यामुळे दोन्ही टीम्सना परिस्थितीचा अंदाज आहे, पण नवीन खेळपट्टी कुणाचे नशीब उघडणार हे रविवारीच स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world