न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारताला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील सामना न्यूझीलंडने 25 धावांनी जिंकला. कसोटी मालिकेत न्यूझीलंडला 3-0 असं निर्भेळ यश मिळवलं आहे.
टीम इंडियाचा भारतीय भूमीवर पहिल्यांदाच एखाद्या संघाने क्लीन स्वीप केलं आहे. भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी याही सामन्यात कायम होती. सलग तीन पराभवांमुळे टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलसाठीची वाट आता अवघड बनली आहे.
तिसऱ्या कसोटीमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पहिल्या डावात 235 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 263 धावांवर संपला. भारताकडे 28 धावांची आघाडी होती. त्यानंतर न्यूझीलंडचा दुसरा डाव 174 धावांवर संपला आणि त्यांनी एकूण 146 धावांची आघाडी घेतली. भारतासमोर 147 धावांचे लक्ष्य होते, मात्र भारतीय संघ 121 धावांवरच मर्यादित राहिला. भारताकडून ऋषभ पंतने दुसऱ्या डावात सर्वाधिक 64 धावा केल्या, तर न्यूझीलंडकडून एजाज पटेलने सहा विकेट घेतल्या.
भारताचा लाजिरवाणा पराभव
केन विल्यमसनशिवाय खेळलेल्या मालिकेत न्यूझीलंड चमकदार कामगिरी केली आहे. न्यूझीलंडने भारताविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मायदेशात झालेल्या दोन किंवा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला दुसऱ्यांदा क्लीन स्वीप मिळाला आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या मालिकेत भारताचा 2-0 असा पराभव केला होता. त्याचबरोबर घरच्या मैदानावर तीन किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला प्रथमच क्लीन स्वीप मिळाला आहे.
12 वर्षांनंतर भारताने कसोटी मालिका गमावली
न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. याशिवाय टीम इंडियाला क्लीन स्वीपही दिला. भारताने 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली आहे. घरच्या मैदानावर सलग 18 मालिका विजयांची मालिकाही खंडित झाली आहे.
WTC अंतिम गुणतालिकेत मोठा झटका
टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम गुणतालिकेत मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाला आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पोहोचण्यासाठीही कसरत करावी लागणार आहे. मुंबई कसोटीपूर्वी टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होती. मात्र या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. भारतीय संघाच्या पराभवाचा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला चांगलाच फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियन संघ आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर न्यूझीलंडचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे.