क्रिकेटमधील कोणत्याही प्रकारात फलंदाजांचं वर्चस्व असतं. जगातील सर्वात प्रतिष्ठेची असलेली इंडियन प्रीमियर लीगही (आयपीएल) त्याला अपवाद नाही. आयपीएलमध्ये जगभरातील दिग्गज फलंदाज खेळतात. त्यांच्यामध्ये नव-नवे रेकॉर्ड्स करण्याची तसंच सर्वाधिक रन्स करण्याची स्पर्धा असते. या स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्या फलंदाजांना ऑरेंज कॅप दिली जाते. 2008 मध्ये झालेल्या पहिल्या सिझनपासून ही प्रथा सुरु आहे. गेल्या 16 वर्षांच्या इतिहासात काही दिग्गज खेळाडूंना आजवर कधीही ऑरेंज कॅप मिळालेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसंच आयपीएलमध्ये भरपूर रन्स करुनही त्यांना ऑरेंज कॅपनं हुलकावणी दिलीय.
शिखर धवन : सध्या पंजाब किंग्जचा कॅप्टन असलेला शिखर धवन या स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिखर धवननं 217 मॅचमध्ये 6617 रन्स केले आहेत. यामध्ये 2 शतक आणि तब्बल 50 अर्धशतकांचा समावेश आहे. पण त्याला गेल्या 16 सिझनमध्ये एकदाही ऑरेंज कॅप मिळवता आलेली नाही.
गौतम गंभीर : गौतम गंभीरच्या कॅप्टनसीमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं दोन वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. गंभीरनं 154 मॅचमध्ये 4217 रन्स केले आहेत. यामध्ये 36 अर्धशतकांचा समावेश आहे. दिल्ली आणि कोलकाताला अनेक संस्मरणीय विजय मिळवून देणाऱ्या गंभीरलाही कधी ऑरेंज कॅप मिळाली नाही.
वीरेंद्र सेहवाग : भारताच्या आक्रमक क्रिकेटपटूंचा इतिहास वीरेंद्र सेहवागला वगळून लिहणे शक्य नाही. आजही त्याच्या काही इनिंग सर्वांच्या लक्षात आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक रन्स करण्याचा रेकॉर्ड सेहवागच्याच नावावर आहे. त्यानं 104 आयपीएल मॅचमध्ये 2 शतक आणि 17 अर्धशतक झळकावली आहेत. पण, या स्पर्धेत ऑरेंज कॅप त्याला कधीही मिळालेली नाही.
सुरेश रैना : 'मिस्टर आयपीएल' या नावानं ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाचं नाव या यादीमध्ये पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, हे खरं आहे. रैनानं 205 आयपीएल मॅचमध्ये 1 शतक आणि 39 अर्धशतकांसह 5528 रन्स केले आहेत.
एबी डीव्हिलियर्स : दक्षिण आफ्रिकेचा डिव्हिलियर्स भारतामध्ये लोकप्रिय होण्यात आयपीएलचा मोठा वाटा आहे. विराट कोहली आणि डीव्हिलियर्स या आरसीबीच्या जोडी नंबर 1 नं अनेक संस्मरणीय भागिदारी केल्या आहेत. अवघ्या काही बॉलमध्ये मॅचचं चित्र बदलण्याची क्षमता डिव्हिलियर्समध्ये होती. त्यानं 184 आयपीएल मॅचमध्ये 3 शतक आणि 40 अर्धशतकांसह 5162 रन्स केले आहेत. डीव्हिलियर्सलाही त्याच्या आयपीएल कारकिर्दीमध्ये कधीही ऑरेंज कॅप मिळाली नाही.