आयपीएल 2026 चा थरार सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोटातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी स्पष्ट केले की, या हंगामात रोहित शर्मा केवळ फलंदाजीपुरता मर्यादित न राहता जास्तीत जास्त वेळ क्षेत्ररक्षणासाठीही मैदानावर उपलब्ध असावा, असा त्यांचा प्रयत्न असेल.
गेल्या वर्षीच्या भूमिकेवर स्पष्टीकरण
आयपीएल 2025 मध्ये रोहित शर्माला काही किरकोळ दुखापती होत्या, त्यामुळे त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवण्यात आले होते. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी रोहितला केवळ फलंदाजीसाठी वापरण्याच्या पद्धतीवर टीका केली होती. जयवर्धने यांनीही मान्य केले की, अशा भूमिकेमुळे खेळाडूची 'रिदम' बिघडू शकते. "रोहित मैदानावर असो किंवा नसो, त्याचा संघावर मोठा प्रभाव असतो. पण यंदा मला त्याला जास्तीत जास्त वेळ मैदानात पाहायचे आहे," असे जयवर्धने म्हणाले.
(नक्की वाचा- IPL 2026: SRH ला मिळणार नवा कर्णधार? टी20 वर्ल्ड कप गाजवणारा 'धुरंधर' करणार हैदराबादचं नेतृत्व?)
हार्दिक पंड्यासाठी पर्यायांची जुळवाजुळव
जयवर्धने यांनी मिश्किल टिप्पणी करताना सांगितले की, मुंबई इंडियन्सच्या संघात बहुतेक खेळाडू अष्टपैलू आहेत. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे दोनच खेळाडू सध्या गोलंदाजीमध्ये योगदान देत नाहीत. कर्णधार हार्दिक पंड्याला मैदानात जास्तीत जास्त गोलंदाजीचे पर्याय हवे असल्यास, परिस्थितीनुसार रोहितला पुन्हा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापरावे लागेल का, यावर चर्चा सुरू आहे.
जयवर्धने यांच्या विधानानुसार, रोहित शर्मा पूर्णवेळ खेळाडू म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, प्रतिस्पर्धी संघ आणि खेळपट्टीची गरज लक्षात घेऊन हार्दिक पंड्याला अतिरिक्त गोलंदाज हवा असल्यास शेवटच्या क्षणी निर्णय बदलला जाऊ शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world