जाहिरात

CSK vs PBKS : चेन्नईचा 'तो' मास्टर प्लॅन सलग दुसऱ्यांदा फसला, हुकमी एक्काच ठरतोय पत्त्याचा बंगला !

Sanju Samson : चेन्नई सुपर किंग्सने ज्याला आपला हुकमी एक्का मानले तोच संजू सॅमसन टीमसाठी डोकेदुखी ठरत आहे.

CSK vs PBKS : चेन्नईचा 'तो' मास्टर प्लॅन सलग दुसऱ्यांदा फसला, हुकमी एक्काच ठरतोय पत्त्याचा बंगला !
CSK vs PBKS : आयपीएल 2026 च्या सुरुवातीलाच चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी वाढलीय.
मुंबई:

Chennai Super Kings vs Punjab Kings : आयपीएल 2026 मधील चेन्नई सुपर किंग्सचा फ्लॉप शो कायम आहे. शुक्रवारी पंजाब किंग्जनं सीएसकेचा 5  विकेट्सनं पराभव केला. 

चेन्नईनं पहिल्यांदा बॅटिंग करत 5 आऊट 209 रन केले होते. सीएसकेच्या बॉलर्सना 210 च्या टार्गेटचं संरक्षण करता आलं नाही. सीएसकेचा या सिझनमधील हा सलग दुसरा पराभव आहे. सीएसकेच्या या पराभवाचं कारण साधारण बॉलिंग तर आहेच पण, ज्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यानं सलग दुसऱ्यांदा केलेली निराशा आहे.  

चेन्नई सुपर किंग्सने ज्याला आपला हुकमी एक्का मानले, ज्याच्यासाठी आपला सर्वात मोठा आधारस्तंभ असलेला रवींद्र जडेजा पणाला लावला, तोच संजू सॅमसन आता सीएसकेसाठी मोठी डोकेदुखी ठरू लागला आहे. राजस्थान रॉयल्सकडून चेन्नईत दाखल झालेल्या संजूकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र सलग दुसऱ्या सामन्यात तो सपशेल फेल ठरल्याने चेन्नईची  चिंता वाढली आहे.  संजूच्या या फ्लॉप शोमुळे सीएसकेची सलामीची जोडी पुन्हा एकदा कोलमडली असून सीएसकेसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

संजू सॅमसनला काय झालंय?

पंजाब किंग्सविरुद्धच्या शुक्रवारच्या सामन्यात कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन ही जोडी मैदानात उतरली होती. पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर संजू या सामन्यात काहीतरी खास करेल, असे वाटत होते. मात्र, केवळ 7 रन करून संजू पॅव्हेलियनमध्ये परतला आणि चाहत्यांचा मोठा भ्रमनिरास झाला. 

अर्शदीप सिंगच्या पहिल्या ओव्हरमध्ये त्याने सावध सुरुवात करत 3 रन काढले. त्यानंतर झेव्हियर बार्टलेटच्या ओव्हरमध्ये एक देखणा फोर लगावल्यानं त्याने लय पकडल्याचे वाटले, पण पुढच्याच बॉलवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो कॅच आऊट झाला. सलग दोन सामन्यांत संजूला साधी दुहेरी धावसंख्याही ओलांडता आलेली नाही.

( नक्की वाचा : Ayush Mhatre : रोहित शर्माने आयुष म्हात्रेला घरी का बोलावलं? 2 तास चाललेल्या 'त्या' भेटीचा भावूक किस्सा उघड )

 हुकमी एक्का ठरतोय फेल

चेन्नई सुपर किंग्सने एका मोठ्या रणनीतीचा भाग म्हणून संजू सॅमसनला आपल्या ताफ्यात सामील केले होते. यासाठी त्यांनी आपला मॅचविनर ऑल राऊंडर रवींद्र जडेजा राजस्थानला दिला. नुकत्याच झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये संजूने 'प्लेअर ऑफ द सीरिज'चा किताब पटकावला होता, त्यामुळे तो चेन्नईसाठी मॅचविनर ठरेल अशी खात्री व्यवस्थापनाला होती. त्याला थेट महेंद्रसिंह धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जात आहे, पण प्रत्यक्ष मैदानात मात्र हा वारसदार सध्या फ्लॉप होतोय.

( नक्की वाचा : Mumbai Cricket: अहमदाबादला टक्कर! मुंबईत उभं राहतंय 1 लाख क्षमतेचं अवाढव्य क्रिकेट स्टेडियम; जाणून घ्या सर्व )

सीएसकेची अडचण वाढली

या हंगामात चेन्नईची बॉलिंग काहीशी कमकुवत आहे, अशा परिस्थितीत रन्सचा डोंगर उभा करण्याची मोठी जबाबदारी सलामीच्या जोडीवर आहे. ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन या जोडीने पावरप्लेमध्ये आक्रमक सुरुवात करणे अपेक्षित आहे. मात्र, पंजाबविरुद्ध बॅटिंगसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवरही संजू लवकर आऊट झाल्याने टीमचे किमान 15 ते 20 रन्स कमी झाले.आता आगामी सामन्यांत संजू आपल्या बॅटने चोख उत्तर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com