जाहिरात

Jemimah Rodrigues: ऐतिहासिक सेंच्युरीनंतर धाय मोकलून का रडू लागली जेमिमा? विजयानंतर केलं मोठं वक्तव्य, VIDEO

Jemimah Rodrigues Statement: जेमिमानं विजयानंतर व्यक्त केलेली भावना तिच्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मानसिक संघर्षाची गोष्ट सांगणारी आहे.

Jemimah Rodrigues: ऐतिहासिक सेंच्युरीनंतर धाय मोकलून का रडू लागली जेमिमा? विजयानंतर केलं मोठं वक्तव्य, VIDEO
Jemimah Rodrigues : जेमिमानं ऐतिहासिक सेंच्युरीनंतर बोलताना मोठं वक्तव्य केलं. ( फोटो - @BCCIWomen/X) )
मुंबई:

Jemimah Rodrigues Statement: आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताने इतिहास घडवला! जेमिमा रोड्रिग्सने (Jemimah Rodrigues) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 127 रनची धडाकेबाज नाबाद खेळी करत, टीम इंडियाला 5 विकेट्सने अविस्मरणीय विजय मिळवून दिला आणि थेट फायनलमध्ये पोहोचवले. वर्ल्ड कपच्या नॉकआऊट मॅचमध्ये 300 हून अधिक रनचा यशस्वी 'चेस' करणारी भारत पहिली टीम ठरली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर, विक्रमी सेंच्युरी झळकावणाऱ्या जेमिमाला स्वत:चे अश्रू आवरले नाहीत. भावनिक झालेल्या जेमिमानं विजयानंतर व्यक्त केलेली भावना तिच्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मानसिक संघर्षाची गोष्ट सांगणारी आहे.

ऑस्ट्रेलियाच्या  15 सामन्यांच्या विजयी मालिकेला ब्रेक

जेमिमा रोड्रिग्सच्या (Jemimah Rodrigues) नाबाद 127 रनच्या ऐतिहासिक खेळीमुळे भारताने केवळ फायनलमध्येच प्रवेश केला नाही, तर महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाची सलग 15 विजयांची मालिका खंडित केली. त्याचबरोबर, या विजयासह टीम इंडिया तिसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. वर्ल्ड कपच्या नॉकआऊट मॅचमध्ये 300 हून अधिक रनचा पाठलाग करून विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सामना जिंकताच जेमिमाला अश्रू अनावर

भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर जेमिमा रोड्रिग्स (Jemimah Rodrigues) प्रचंड भावुक झाली. तिला स्वत:चे अश्रू आवरता आले नाहीत. विजयानंतर ब्रॉडकास्टरशी बोलताना तिने स्वत:च्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

जेमिमाने या यशाबद्दल देव, फॅन्स आणि तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. जेमिमा म्हणाली की, "माझा या सगळ्यावर विश्वास बसत नाहीये. मी हे एकटी करू शकले नसते. मी येशूचे आभार मानते. माझे आई-वडील, कोच आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी आभार मानते."

 अवघी 5 मिनिटांपूर्वी मिळाली माहिती

सेमीफायनल मॅचमध्ये जेमिमा तिसऱ्या क्रमांकावर (Number 3) 'बॅटिंग' करण्यासाठी उतरली होती. पण तिला हा बदल अवघ्या पाच मिनिटांपूर्वी कळला होता. जेमिमा म्हणाली, "मी तिसऱ्या क्रमांकावर 'बॅटिंग' करेन, हे मला माहीत नव्हते. मॅच सुरू होण्यापूर्वी पाच मिनिटे आधी मला सांगण्यात आले की मी तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. हा माझ्याबद्दलचा विषय नव्हता, मला फक्त भारतासाठी ही मॅच जिंकायची होती आणि शेवटपर्यंत ती पूर्ण करायची होती."

( नक्की वाचा : Jemimah Rodrigues : बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण करत टीम इंडियाला फायनलमध्ये नेणारी जेमिमा रॉड्रिग्स कोण आहे? )
 

'वर्ल्ड कप' टीममधून वगळल्यानंतर मानसिक संघर्ष

जेमिमाने यावेळी बोलताना सांगितलं की, तिच्या गेल्या काही महिन्यांचा काळ अत्यंत कठीण होता. ती म्हणाली, "आजचा दिवस माझ्या अर्धशतक किंवा शतकाविषयी नव्हता, तर भारताला विजय मिळवून देण्याबद्दल होता. आतापर्यंत जे काही झाले, ती या क्षणाची तयारी होती."

या संघर्षाबद्दल ती पुढे बोलताना म्हणाली, "गेल्या वर्षी मला या वर्ल्ड कपमधून वगळण्यात आले होते. मी चांगल्या फॉर्ममध्ये होते, पण गोष्टी एकापाठोपाठ घडत गेल्या आणि माझ्या नियंत्रणाबाहेर गेल्या. या संपूर्ण दौऱ्यात मी जवळजवळ दररोज रडले आहे. मानसिकदृष्ट्या ठीक नसणे, चिंतेतून जाणे... पण मला माहीत होतं की मला ही संधी साधायची आहे आणि देवाने सगळ्या गोष्टींची काळजी घेतली.''

'बॅटिंग' करताना आठवले बायबलमधील शब्द

'बॅटिंग' करतानाच्या मानसिक स्थितीबद्दल सांगताना जेमिमा म्हणाली, "सुरुवातीला मी फक्त खेळत होते आणि स्वतःशी बोलत होते. शेवटी, मला बायबलमध्ये लिहिलेली एक गोष्ट आठवली की 'शांतपणे उभे राहा आणि देव माझ्यासाठी लढेल.' मी तिथे उभी राहिले आणि तो (देव) माझ्यासाठी लढला."

स्वत:ची भावना व्यक्त करताना जेमिमा म्हणाली, "माझ्या मनात खूप काही दडलेले होते, पण मी शांत राहण्याचा प्रयत्न करत होते. भारताला 5 विकेट्सने जिंकताना पाहून मी स्वतःला रोखू शकले नाही."

( नक्की वाचा : Jemimah Rodrigues: हा चमत्कार बायबलमुळे झाला! ऑस्ट्रेलियाला लोळवणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्सनं सांगितलं ऐतिहासिक इनिंगचं रहस्य, पाहा VIDEO )
 

सहकाऱ्यांचे आणि फॅन्सचे मानले आभार

जेमिमा टीममधील सहकाऱ्यांचेही आभार मानले. "दीप्तीने माझा उत्साह कायम ठेवला, तर रिचाने येऊन मला उचलून घेतले. माझे सहकारी खेळाडू माझा उत्साह वाढवत होते. मी या खेळीचे श्रेय घेऊ शकत नाही. मी स्वतःहून काहीही केले नाही. प्रेक्षकांमधील प्रत्येक व्यक्तीने माझा उत्साह वाढवला आणि प्रत्येक रनवर त्यांनी मला प्रोत्साहन दिले,'' असं ती शेवटी म्हणाली. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com