India vs South Africa Final: महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 ची फायनल रविवारी (2 नोव्हेंबर 2025) होणार आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील मैदानात होणाऱ्या या मॅचमध्ये यजमान टीम इंडियाची लढत दक्षिण आफ्रिकेशी होईल. भारतीय टीमनं सेमी फायनलमध्ये 7 वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला थरारक लढतीत 5 विकेट्सनं पराभूत केलं. या ऐतिहासिक विजयानंतर आता पहिल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपासून टीम इंडिया फक्त एक विजय दूर आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाची बॅटर जेमिमा रॉड्रिग्स (Jemimah Rodrigues) खूप भावूक झाली होती. विजयानंतर मैदानात आणि 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार स्वीकारताना तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले होते. आता बीसीसीआयने (BCCI) जेमिमाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने ड्रेसिंग रूममध्ये दिलेले प्रेरणादायी भाषण व्हायरल होत आहे. हे भाषण ऐकून भारतीय संघात अंतिम सामना जिंकण्याचा नवा आत्मविश्वास संचारला आहे.
सेमीफायनलमधील कामगिरी आणि जेमिमाची भावनिक प्रतिक्रिया
सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सने पत्रकार परिषदेत आपल्या फॉर्मबद्दल, संघातून वगळल्या गेल्याबद्दल आणि मानसिक तणावावर (Anxiety) मोकळेपणाने चर्चा केली होती. या सामन्यानंतरचा बीसीसीआयने शेअर केलेला व्हिडिओ महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे फील्डिंग कोच मुनीश बाली यांनी टीमला संबोधित केल्यानंतर जेमिमा बोलताना दिसत आहे.
( नक्की वाचा : Jemimah Rodrigues : बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण करत टीम इंडियाला फायनलमध्ये नेणारी जेमिमा रॉड्रिग्स कोण आहे? )
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्सने एक महत्त्वाचा रन आऊट केला आणि एक उत्कृष्ट झेलही घेतला. तिच्या या अप्रतिम फील्डिंगसाठी तिला 'बेस्ट फील्डर'चा मेडल देण्यात आला.
यावेळी फील्डिंग कोच मुनीश बाली यांनी संघातील इतर खेळाडूंचेही कौतुक केले. त्यांनी रेणुका ठाकूरने 10 वेळा बॉल थांबवल्याबद्दल, श्री चरणीने घेतलेल्या 'कॉट अँड बोल्ड'बद्दल तसेच क्रांती गौडाच्या फिल्डिंगची विशेष प्रशंसा केली.
जेमिमा रॉड्रिग्सचं प्रेरणादायी भाषण
बेस्ट फील्डरचा मेडल स्वीकारल्यानंतर बोलताना जेमिमा रॉड्रिग्सने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिच्या इनिंगचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, '' मी 85 रनवर खेळत असताना खूप थकले होते. टीमच्या खेळाडू मैदानावर येऊन मला पाणी देत होत्या आणि धीर देत होत्या."
"मी दीप्ती शर्माला (Deepti Sharma) 'माझ्याशी बोलत राहा' असे सांगितले आणि तिने मला सतत प्रोत्साहित केले. एवढेच नाही तर तिने माझ्या एका रनसाठी स्वतःची विकेटही बहाल केली. ती पॅव्हेलियनमध्ये परत जात असताना मला म्हणाली, 'काही हरकत नाही, फक्त तू मॅच जिंकून ये...'"
"काही खास खेळी (Special Innings) नेहमी लक्षात राहतात, पण पार्टनरशिपशिवाय किंवा इतरांनी केलेल्या छोट्या-मोठ्या योगदानाशिवाय त्या शक्य नाहीत. दीप्ती, ऋचा घोष आणि अमनजोत कौर यांच्या खेळी खूप महत्त्वाच्या होत्या. तसेच, दीदी (हरमनप्रीत कौर) सोबतची पार्टनरशिप शानदार झाली."
( नक्की वाचा : Amol Muzumdar: 'झिरो' आंतरराष्ट्रीय मॅच! तरीही महिला टीमचा 'हीरो' अमोल मुजुमदार कोण आहे? )
बदललेल्या टीम इंडियाचा उल्लेख
जेमिमा पुढे म्हणाली, "पूर्वी अनेकदा असे व्हायचे की, आमची एक विकेट पडली की आम्ही मॅचमध्ये पराभूत व्हायचो.. पण आता या टीम इंडियाने ही गोष्ट बदलली आहे." व्हिडिओच्या शेवटी तिने अत्यंत आत्मविश्वासपूर्ण संदेश दिला: "आम्ही आतापर्यंत इतकं केलं आहे, आता फक्त एक मॅच आणखी..." जेमिमाचा हा स्पष्ट इशारा वर्ल्ड कप फायनल जिंकण्याकडे होता.
Player of the match ✅
— BCCI Women (@BCCIWomen) October 31, 2025
Fielder of the match ✅
🎥 𝐃𝐫𝐞𝐬𝐬𝐢𝐧𝐠 𝐫𝐨𝐨𝐦 𝐁𝐓𝐒 𝐰𝐢𝐭𝐡 𝐉𝐞𝐦𝐢𝐦𝐚𝐡 𝐑𝐨𝐝𝐫𝐢𝐠𝐮𝐞𝐬 celebrating unseen moments and team spirit 💙
Get your #CWC25 tickets 🎟 now: https://t.co/vGzkkgwXt4 #WomenInBlue | #INDvAUS | @JemiRodrigues pic.twitter.com/9cDzPl2nKQ
पहिल्या वर्ल्ड कप विजेतेपदाची संधी
भारतीय महिला संघाने यापूर्वी 2005 आणि 2017 च्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, त्यांना एकदाही विजेतेपद पटकावता आले नाही. त्यामुळे, जेमिमा रॉड्रिग्स आणि संपूर्ण टीम इंडियासाठी हा वर्ल्ड कप जिंकण्याची आणि देशासाठी पहिले वनडे वर्ल्ड कप विजेतेपद मिळवण्याची ऐतिहासिक संधी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world