गेल्या वर्षी - २०२३ महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आता महिलांसाठी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेच्या आयोजनाची घोषणा केली आहे. राज्य क्रिकेट संघटनेतर्फे स्वतंत्रपणे महिला प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करणारी एमसीए ही देशातील पहिली संघटना ठरली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) मान्यतेखाली या स्पर्धेचे येत्या 24 जून 2024 पासून गहुंजे येथील एमसीए स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार, एमसीएचे सचिव अॅड. कमलेश पिसाळ, सहसचिव संतोष बोबडे, खजिनदार संजय बजाज, एमपीएलचे चेअरमन सचिन मुळे, एमसीएचे अॅपेक्स काऊन्सिल सदस्या कल्पना तापिकर आदी मान्यवर उपस्थित होते.
WMPL ही स्पर्धा महिला क्रिकेट मधील एक मैलाचा दगड गाठला जाणार असल्याची प्रतिक्रिया एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी व्यक्त केली. महिला क्रिकेटच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून महाराष्ट्रातील गुणवान महिला क्रिकेटपटूंना या स्पर्धेमुळे हक्काचे व्यासपीठ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या डब्लूएमपीएल स्पर्धेत एमसीएच्या कार्यकक्षेतील चार शहरांचे प्रतिनिधीत्व करणारे चार संघ सहभागी होणार आहेत. राउंड रॉबिन पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक संघ सहा साखळी सामने खेळणार असून सर्वोत्तम दोन संघ अंतिम लढतीसाठी पात्र ठरणार आहे.
स्मृती मंधाना, देविका वैद्य सारख्या स्टार खेळाडूही होणार सहभागी -
यंदाच्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेत स्मृती मंधाना, देविका वैद्य, अनुजा पाटील, किरण नवगिरे आणि श्रद्धा पोखरकर अशा महाराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असल्याचे सांगून रोहित पवार पुढे म्हणाले की, या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा आणि स्पोर्टस 18 या वाहिन्यांवरून करण्यात येणार आहे. त्यामुळे महिला क्रिकेटचा प्रसार चांगल्या पद्धतीने होईल. या स्पर्धेसाठी विजेत्या संघाला एकूण 20 लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार असून उपविजेत्या संघाला 10 लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. महिला प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या लिलावासाठी एमसीएच्या वतीने खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्या खेळाडूंमधून चारही संघांचे संघ मालक आपापल्या संघासाठी खेळाडूंची खरेदी करतील.
बीसीसीआयच्या नियमाप्रमाणे चारही फ्रँचायझीच्या मालकांचे नोंदणीकृत कार्यालय, व्यवसायाचे मुख्य ठिकाण, महाराष्ट्रात असणे आवश्यक आहे. संघ खरेदी करू इच्छिणाऱ्या फ्रँचायझींनी एमसीएच्या www.cricketmaharashtra.com या संकेत स्थळावरून अर्ज डाउनलोड करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या वर्षी एमसीए तर्फे सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेला प्रचंड यश मिळाले. या स्पर्धेत ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, राहुल त्रिपाठी व आर्शीन कुलकर्णी असे नामवंत खेळाडू सहभागी झाले होते. ही स्पर्धा डीडी स्पोर्ट्स या वाहिन्यांवरून प्रक्षेपित करण्यात आली होती.
या स्पर्धेसंबंधी महत्वाच्या तारखा अशा आहेत:
1. संघ खरेदीसाठी एमसीएच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध : 7 एप्रिल 2024
2. फ्रँचायझींनी अर्ज करण्याची मुदत : 24 एप्रिल 2024
3. संघ मालक निश्चित करण्यासाठी लिलाव : 27 एप्रिल 2024
4. खेळाडूंचा लिलाव : 11 मे 2024
5. डब्लूएमपीएल स्पर्धेस प्रारंभ : 24 जून 2024
फ्रँचायझी खरेदी करण्यासाठी इच्छुक संघ मालकांनी आपला अर्ज विहित नमुण्यानुसार ई मेल द्वारे या ई मेल आयडीवर 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्या पूर्वी पाठवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हे अर्ज पाठविण्याची सुचना व्हॉट्स ॲप द्वारे स्पर्धा संचालक राजेश राणे यांना 9890263111 या क्रमांकावर कळविणे बंधनकारक आहे.