Mary Kom's Ex-Husband Onler Claims She Had Affair with Junior Boxer : भारताची दिग्गज बॉक्सर मेरी कोम आणि तिचा माजी पती ऑनलर यांच्यातील कौटुंबिक वाद आता चव्हाट्यावर आला आहे. मेरीने काही काळापूर्वी ऑनलरवर आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप केले होते. मात्र, आता ऑनलरने या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना मेरीवरच खळबळजनक आरोप केले आहेत. मेरीचे एका ज्युनियर बॉक्सरसोबत प्रेमसंबंध होते, असा दावा ऑनलरने केला आहे.
ज्युनियर बॉक्सरसोबतचे ते संबंध
ऑनलरने या वादात अनेक जुन्या गोष्टी बाहेर काढल्या आहेत. त्याच्या सांगण्यानुसार, 2013 मध्ये मेरी कोमचे एका ज्युनियर बॉक्सरसोबत अफेअर सुरू होते. या प्रकरणामुळे त्यावेळी दोन्ही कुटुंबांमध्ये मोठे भांडण झाले होते. मात्र, त्या वेळी सामोपचाराने हा वाद मिटवण्यात आला होता. पण हे प्रकरण तिथेच थांबले नाही, असेही त्याने यावेळी आवर्जून सांगितले.
अकॅडमीमधील व्यक्तीसोबत मैत्रीचा दावा
ऑनलरने केवळ 2013 च्याच नव्हे, तर त्यानंतरच्या काळातीलही काही गोष्टी सांगितल्या आहेत. मेरी कोमच्या स्वतःच्या बॉक्सर अकॅडमीमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीसोबत 2017 पासून तिचे संबंध असल्याचा दावा त्याने केला आहे.
या सर्व गोष्टींचे पुरावे म्हणून आपल्याकडे व्हॉट्सॲप मेसेज असल्याचे त्याने म्हटले आहे. या मेसेजमध्ये संबंधित व्यक्तीचे नावही स्पष्ट असल्याचे त्याने स्पष्ट केले.
( नक्की वाचा : Techie Murder: 18 वर्षांचा मुलगा आणि इतकी क्रूरता? खिडकीतून घरात शिरला आणि महिला इंजिनिअरला...अंगावर येईल काटा )
पैशांच्या आरोपांवर स्पष्टीकरण
मेरी कोमने ऑनलरवर 5 कोटी रुपये चोरल्याचा आणि संपत्ती हडपल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना ऑनलर म्हणाला की, मी इतके पैसे चोरले असते, तर आज मला दिल्लीत भाड्याच्या घरात राहावे लागले नसते.
18 वर्षांच्या संसारानंतर आज माझ्याकडे काहीच उरलेले नाही, असे सांगताना त्याने स्वतःचे बँक खाते तपासण्याचे आव्हान दिले. मेरी एक सेलिब्रिटी असल्याने लोक तिचे म्हणणे ऐकून घेतात, पण वस्तुस्थिती वेगळी आहे, असे तो म्हणाला.
( नक्की वाचा : Wrong Number नं फिरवलं आयुष्याचं चाक, 60 वर्षांच्या महिलेनं केलं 35 वर्षांच्या तरुणाशी लग्न, पण, बस स्टॉपवर... )
घटस्फोटावर मांडली भूमिका
आमचा आता घटस्फोट झाला आहे, त्यामुळे मेरीला तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे ऑनलरने स्पष्ट केले. तिला हवे असल्यास ती दुसरे लग्न करू शकते, त्याबद्दल आपली कोणतीही तक्रार नाही. मात्र, स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप करू नयेत, असे त्याने ठणकावून सांगितले. मेरी जिथे राहते आणि ज्याच्यासोबत राहते, त्याबद्दल आपल्याला सर्व काही माहित असल्याचेही त्याने या वेळी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world