जाहिरात

Pakistan Cricket : 3 बॉलमध्ये 4 विकेट्स ! पाकिस्तानमध्ये घडली जगावेगळी गोष्ट

Pakistan Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून पाकिस्तानचं टीम म्हणून आणि यजमान म्हणून आव्हान संपुष्टात आलं आहे. पण, त्यानंतरही पाकिस्तान क्रिकेट चर्चेत आहे.

Pakistan Cricket :  3 बॉलमध्ये 4 विकेट्स ! पाकिस्तानमध्ये घडली जगावेगळी गोष्ट
मुंबई:

सध्या संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीकडं (ICC Champions Trophy) लागलंय. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आता स्पर्धेची फायनल रविवारी खेळली जाईल. यजमान पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान सेमी फायनलपूर्वीच संपुष्टात आलं. टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यानं या स्पर्धेची फायनल देखील लाहोरमध्ये न होता दुबईमध्ये होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून पाकिस्तानचं टीम म्हणून आणि यजमान म्हणून आव्हान संपुष्टात आलं आहे. पण, त्यानंतरही पाकिस्तान क्रिकेट चर्चेत आहे. पाकिस्तान क्रिकेटमधील एका दुर्मीळ घटनेची सध्या क्रिकेट विश्वात चर्चा सुरु आहे. पाकिस्तानमधील एका मॅचमध्ये चक्क तीन बॉलमध्ये चार विकेट्स पडल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नेमकं काय घडलं?

पाकिस्तानमध्ये सध्या 'पाकिस्तान प्रेसिडेंट्स ट्रॉफी ग्रेड-I' स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील स्टेट बँक ऑफ पाकिस्तान विरुद्ध पाकिस्तान टेलिव्हिजन या मॅचमध्ये हा प्रकार घडला. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानची टीम पहिल्यांदा बॅटिंग करताना 205 रन्सवरच ऑल आऊट झाली. 

पाकिस्तान टेलिव्हिजनकडून मोहम्मद शहजादनं या मॅचमध्ये हॅटट्रिक घेतली. त्यानं उमर अमीन, फवाद आलम आणि इराफान खान यांना सलग तीन बॉलवर आऊट करत हॅटट्रिक घेतली. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर सौद शकील बॅटिंगसाठी आला. पण, तो डगआऊटमधून उशीरा बाहेर आला. त्यानं निर्धारित तीन मिनिटांमध्ये स्ट्राईक घेतला नाही. त्यामुळे शकीलला Timed Out घोषित करण्यात आले. अशा पद्धतीनं या मॅचमध्ये 3 बॉलवर चार खेळाडू आऊट झाले.

सौद शकील हा Timed Out होणारा पहिला पाकिस्तानी क्रिकेटपटू बनला आहे. पाकिस्तान टेलिव्हजनचा कॅप्टन अहमद बटनं अपिल केल्यानं अंपायरनं शकीलला Timed Out घोषित केलं.

( नक्की वाचा : Mohammed Shami : टीम इंडियाचा हिरो शरियताचा गुन्हेगार! का संतापले मौलाना? )
 

वर्ल्ड कपमध्ये झाला होता वाद

वर्ल्ड कप 2023 मध्ये श्रीलंका विरुद्ध बांगलादेश या मॅचमध्येही Timed Out चा प्रकार घडला होता. त्या मॅचमध्ये श्रीलंकेचा ऑल राऊंडर अँजलो मॅथ्यूजला या पद्धतीनं आऊट देण्यात आलं होतं. त्या मॅचमध्ये मॅथ्यूज बॅटिंगसाठी तयार झाला होता. पण, त्याचं हेल्मेट तुटलं होतं. त्यामुळे त्याला निर्धारित वेळेत स्ट्राईक घेता आली नाही. त्यावर बांगलादेशच्या कॅप्टननं अपील केलं. त्यावर अंपायरनं मॅथ्यूजला 'टाईम आऊट' घोषित केलं होतं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: