PM Modi Team India Meet: भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच महिला वनडे विश्वचषक 2025 जिंकून जो इतिहास रचला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः पुढाकार घेत आहेत. गुरुवारी (5 नोव्हेंबर) पंतप्रधान मोदी विश्वविजेत्या टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंची भेट घेणार आहेत.
हा सत्कार केवळ औपचारिक नाही, तर पंतप्रधानांचा खेळाडूंशी असलेला जिव्हाळा आणि खेळांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणात्मक बांधिलकीचे प्रतीक आहे. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले होते, आता प्रत्यक्ष भेटीत ते खेळाडूंशी संवाद साधून त्यांना विशेष गौरव प्रदान करतील. हा क्षण भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
पंतप्रधानांनी केले अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयानंतर संघाचे अभिनंदन केले. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, संघाचे प्रदर्शन कौशल्य, आत्मविश्वास आणि टीमवर्कने परिपूर्ण होते. हा ऐतिहासिक विजय भावी पिढीतील चॅम्पियन खेळाडूंना प्रेरणा देईल, असेही ते म्हणाले.
मोदी सरकार खेळांना राष्ट्रनिर्माणाची शक्ती मानते. गेल्या 11 वर्षांत खेळांच्या धोरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत.
क्रीडा बजेटमध्ये मोठी वाढ
खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारने पायाभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक केली आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 साठी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाला 3,794 कोटी रुपये इतकं विक्रमी बजेट मिळाले. हे बजेट 2014-15 च्या तुलनेत 130.9% जास्त आहे. देशभरात 323 नवीन क्रीडा प्रकल्पांवर 3074 कोटी रुपये गुंतवले जात आहेत.
( नक्की वाचा : EXCLUSIVE: 'खाण्यासाठी पैसे नव्हते', वर्ल्ड चॅम्पियन Kranti Goud ने NDTV ला सांगितली संघर्षाची कहाणी, पाहा Video )
'खेलो इंडिया' आणि 'TOPS' ठरले गेम चेंजर
खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी ‘खेलो इंडिया' आणि ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS)' या योजना सुरू करण्यात आल्या.
TOPS योजनेत ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंना दरमहा 50,000 रुपये स्टायपेंड आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण दिले जाते. ‘खेलो इंडिया' मुळे ग्रामीण भागातील खेळाडूंनाही मोठा मंच मिळाला. गेल्या आठ वर्षांत 19 खेलो इंडिया स्पर्धा पार पडल्या. या योजनेतून 2781 हून अधिक खेळाडूंना मदत मिळाली आहे.
याचा परिणाम म्हणजे, 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 107 पदके जिंकली आणि पॅरालिम्पिकमध्ये भारताने 29 पदकांसह आतापर्यंतचा सर्वोत्तम प्रदर्शन केला.
1057 खेलो इंडिया केंद्रे आणि 34 उत्कृष्टता केंद्रांमुळे आज तळागाळातील प्रतिभेला वाव मिळत आहे. तसेच, ‘अस्मिता महिला लीग्स' मुळे महिलांचा खेळातील सहभाग वाढला आहे. या सर्व योजनांमुळे खेळ आता भारताच्या प्रगतीच्या कहाणीचा अविभाज्य भाग बनले आहेत.