Kranti Goud Exclusive Interview: भारतीय महिला क्रिकेट टीमने आयसीसी वनडे वर्ल्ड कपचा (ICC ODI World Cup) विजेतेपद जिंकून इतिहास घडवला. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडिया विश्वविजेता बनली. या विजयाच्या अनेक नायिकांपैकी एक नाव म्हणजे क्रांती गौड. मध्य प्रदेशातल्या बुंदेलखंडमधील एका लहानशा गावातल्या क्रांतीने फक्त 5 महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ही 22 वर्षांची खेळाडू रातोरात देशाची नायिका बनली आहे.
ऑस्ट्रेलियाची कॅप्टन एलिसा हीलीला (Alyssa Healy) सेमीफायनलमध्ये स्वस्तात पॅव्हेलियनचा रस्ता दाखवणाऱ्या क्रांतीनं, वर्ल्ड चॅम्पियन (World Champion) बनल्यानंतर NDTV शी बोलताना तिच्या संघर्षाची कहाणी आणि भविष्यातील स्वप्ने सांगितली. एका लहानशा गावातून जागतिक पातळीवर (World Stage) स्वत:ची ओळख निर्माण करणारी क्रांती गौडची (Kranti Goud) प्रेरणादायी गोष्ट खूप भावुक आणि संघर्षपूर्ण आहे.
ऑस्ट्रेलियन कॅप्टनवर निर्विवाद वर्चस्व
NDTV चे स्पोर्ट्स एडिटर विमल मोहन (Vimal Mohan) यांनी क्रांती गौडशी खास बातचीत केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिचा अनुभव फक्त 5 महिन्यांचा असला तरी, ऑस्ट्रेलियाची कॅप्टन एलिसा हीलीविरुद्ध (Alyssa Healy) तिचा रेकॉर्ड अविश्वसनीय आहे. तिने हीलीला आत्तापर्यंतच्या 5 सामन्यांपैकी तब्बल 4 वेळा आऊट केले आहे.
( नक्की वाचा : Amol Muzumdar च्या संघर्षाची कहाणी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत संधी न मिळण्याची खरी 4 कारणं )
याबद्दल बोलताना क्रांती म्हणाली, "ती खूप चांगली आणि खूप मोठी खेळाडू आहे. पण मलाही खूप छान वाटतं. मी एक टारगेट (Target) घेऊन खेळते की, आज यांना आऊट करायचंच आहे. त्या दिवशी (सेमीफायनलमध्ये) देखील मी विचार केला होता की, आज तिची विकेट मीच घेणार."
.... अजूनही विश्वास नाही
अवघ्या 22 व्या वर्षी विश्वविजेता बनणे हे एखाद्या स्वप्नासारखेच आहे. या अविस्मरणीय क्षणाबद्दल क्रांती गौडने आपल्या भावना व्यक्त केल्या.
ती म्हणाली, "आत्तापर्यंत विश्वासच बसत नाहीये की आम्ही वर्ल्ड कप जिंकलो. ट्रॉफीला स्पर्श केला, तो क्षण खरंच खूप वेगळा होता. प्रथम भारतसाठी खेळणे, मग वर्ल्ड कप खेळणे आणि तो जिंकणे, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि मी ज्या छोट्या घुवारा (Ghuara) गावातून येते, त्यांच्यासाठी ही खूप अभिमानाची (Pride) गोष्ट आहे. काल जेव्हा मॅच होती, तेव्हा माझ्या गावात खूप मोठी स्क्रीन (Screen) लावण्यात आली होती. लोकांनी मॅच बघितली आणि जिंकल्यानंतर त्यांनी फटाके फोडले. हे पाहून मी देखील खूप भावूक झाले."
( नक्की वाचा : Jemimah Rodrigues: हा चमत्कार बायबलमुळे झाला! जेमिमा रॉड्रिग्सनं सांगितलं ऐतिहासिक इनिंगचं रहस्य, पाहा Video )
संघर्षमय प्रवासाची कहाणी
सामन्यादरम्यान विकेट घेतल्यावरच्या तिच्या सेलिब्रेशनबद्दल बोलताना तिने सांगितले की, हे उत्स्फूर्तपणे (Spontaneously) होतं.
आपल्या संघर्षाबद्दल (Struggle) बोलताना क्रांतीने एक अत्यंत भावुक गोष्ट सांगितली: "माझा प्रवास पाहिला तर तो खूप भावनिक आहे. मी अनेक गोष्टींचा सामना केला आहे. एक वेळ अशी होती, जेव्हा आमच्याकडे खायलाही नव्हतं. आज परिस्थिती बदलली आहे. मी अनेक स्वप्ने पाहिली आहेत आणि ती मी नक्कीच पूर्ण करेन."
काय आहे क्रांतीचं स्वप्न?
आपल्या गावातील क्रिकेटमध्ये (Cricket) यामुळे बदल होईल का, या प्रश्नाचे उत्तर देताना क्रांतीने आपले मोठे स्वप्न उघड केले.
ती म्हणाली, "मी असा विचार केला आहे की, मी घुवारा गावात मुला-मुलींसाठी एक क्रिकेट अकादमी (Cricket Academy) सुरू करेन. माझा हाच संदेश राहील. कारण, मी पाहिलं आहे की मी जिथे राहते, तिथे आधी मुली घराबाहेरही पडत नव्हत्या. आज त्यांच्या पालकांचे, वडिलांचे मला फोन येतात आणि ते म्हणतात की, 'मला माझ्या मुलीला क्रिकेट शिकवण्यासाठी कुठे पाठवायचे?' हे ऐकून खूप अभिमान वाटतो की, किमान माझ्यामुळे का होईना, त्यांच्या पालकांमध्ये इतकी जागरूकता (Awareness) निर्माण झाली की, त्यांनी आपल्या मुलांनाही संधी द्यावी."
इथे पाहा संपूर्ण मुलाखत
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world