Rohit Sharma: रोहितच्या वनडे कारकिर्दीचा शेवट? 'या' खेळाडूसाठी निवृत्ती घ्यावी लागणार? BCCI वर नाराज

Rohit Sharma : आगामी 2027 च्या वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर, BCCI निवड समिती तरुण खेळाडूंना संधी देण्यासाठी रोहितच्या पुढे विचार करत आहे. त्यामुळे लॉर्ड्सवर रोहितचा शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या एकच मोठी चर्चा सुरू आहे, ती म्हणजे दिग्गज फलंदाज आणि भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या एकदिवसीय (ODI) कारकिर्दीची सांगता. आगामी 2027 मधील वनडे वर्ल्ड कपसाठी बीसीसीआय आणि टीम इंडियाने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित शर्माला वनडे संघातून वगळण्याबाबतच्या चर्चांना प्रचंड उधाण आले आहे. गुरुवारी समोर आलेल्या विविध रिपोर्ट्सनुसार, 19 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणारा भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना रोहित शर्माच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरू शकतो.

बीसीसीआयच्या निर्णयावर रोहित शर्मा नाराज?

'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडविरुद्धच्या चालू तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान रोहित शर्माने बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान निवड समितीच्या निर्णयावर रोहित 'नाखूष' असल्याचे सांगण्यात येत आहे.

निवड समितीने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात रोहित शर्माशी सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान निवड समितीने रोहितला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, आगामी 2027 च्या वर्ल्ड कपच्या दृष्टीने ते आता रोहितच्या पलीकडे जाऊन विचार करत आहेत. 2027 चा वर्ल्ड कप येईपर्यंत रोहितचे वय 40 पेक्षा जास्त होणार आहे, त्यामुळे भविष्याचा विचार करून हा कठोर निर्णय घेण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)

तरुण खेळाडूंना संधी देण्यावर भर

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने आयएएनएस (IANS) वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, "निवड समितीने निर्णय घेतला आहे की लॉर्ड्सवरील सामन्यानंतर रोहित शर्माची एकदिवसीय संघात निवड केली जाणार नाही. रोहितने अत्यंत मानाने आणि आदरपूर्वक निवृत्ती जाहीर करायची की नाही, हा पूर्णपणे त्याचा वैयक्तिक निर्णय असेल. मात्र, निवड समितीचा संदेश अगदी स्पष्ट आहे."

सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल बऱ्याच काळापासून संघात स्थान मिळवण्यासाठी वाट पाहत आहे. पुढील वर्ल्ड कपचा विचार करता यशस्वी जयस्वालसारख्या तरुण खेळाडूंना पुरेशी संधी देणे आणि त्यांना तयार करणे याला निवड समितीने प्राधान्य दिले आहे.

(नक्की वाचा-  Rain News: गायब झालेला मान्सून पुन्हा सक्रिय, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट')

एकदिवसीय क्रिकेटमधील एक सुवर्णकाळ संपणार

रोहित शर्माने यापूर्वीच 7 मे 2025 रोजी भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर शुभमन गिलकडे कसोटीचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. आता एकदिवसीय क्रिकेटमधूनही त्याचा पत्ता कट होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

रोहित शर्माने आपल्या अद्भूत कारकिर्दीत 286 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11,731 धावा कुटल्या आहेत. याशिवाय त्याने 56 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले, ज्यामध्ये 2023 च्या वर्ल्ड कप फायनलपर्यंत आणि युएईमध्ये पार पडलेल्या 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाचा समावेश आहे.
 

Advertisement

Topics mentioned in this article