
Ruturaj Gaikwad : महाराष्ट्राचा शैलीदार बॅटर ऋतुराज गायकवाडवर निवड समितीनं पुन्हा एकदा अन्याय केला आहे. सातत्यानं दमदार कामगिरी करुनही त्याला निवड समितीनं डावललं आहे. शनिवारी ऑस्ट्रेलिया-ए विरुद्धच्या 2 सामन्यांच्या मालिकेसाठी जाहीर झालेल्या 'इंडिया-ए' संघात त्याला स्थान मिळाले नाही. मुंबईकर श्रेयस अय्यर या टीमचा कॅप्टन आहे.
ऋतुराजनं सध्या सुरु असलेल्या दुलीप टॉफीमध्ये मोठी सेंच्युरी झळकावली. यापूर्वी त्याने बुची बाबू स्पर्धेतही धावांचा पाऊस पाडला होता. मात्र, निवडकर्त्यांकडून त्याला सातत्याने दुर्लक्षित केले जात आहे.
डबल सेंच्युरीला हुलकावणी
दुलीप ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट झोनकडून खेळताना ऋतुराजचे द्विशतक थोडक्यात हुकले. सेंट्रल झोनविरुद्धच्या या सामन्यात त्याने 89.32 च्या प्रभावी स्ट्राइक रेटने 206 बॉलमध्ये 184 रन्सची शानदार खेळी केली. या इनिंगमध्ये त्याने 25 फोर आणि 1 सिक्स लगावला. यापूर्वी, बुची बाबू स्पर्धेत त्याने 144 चेंडूंमध्ये 133 रन्स केले होते.
( नक्की वाचा : Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक, टीम आणि स्वरुप )
लखनौमध्ये होणार सामने
भारत आणि ऑस्ट्रेलिया-ए यांच्यात 4 दिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. हे दोन्ही सामने लखनौमध्ये होतील. पहिला सामना 16 ते 19 सप्टेंबरदरम्यान तर दुसरा सामना 23 ते 26 सप्टेंबरदरम्यान खेळला जाईल.
त्यानंतर दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका होईल. एकदिवसीय मालिकेसाठी संघाची अद्याप निवड झालेली नाही. हे 3 सामने 30 सप्टेंबर, 3 ऑक्टोबर आणि 5 ऑक्टोबर रोजी खेळले जातील.
ऑस्ट्रेलिया-ए विरुद्धची 'इंडिया-ए' टीम
श्रेयस अय्यर (कॅप्टन), अभिमन्यु ईश्वरन, नारायण जगदीशन (विकेट किपर), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (व्हाईस कॅप्टन आणि विकेट किपर), देवदत्त पडिक्कल, हर्ष दुबे, आयुष बडोनी, नितीश कुमार रेड्डी, तनुष कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार, खलील अहमद, मानव सुतार, यश ठाकूर.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world