जाहिरात

घट्ट धरलेला हात सोडेना, सचिनच्या डोक्यावरुन हात फिरवित राहिला; विनोद कांबळीचे Video पाहून चाहते स्तब्ध  

एकेकाळी एकमेकांचे घट्ट मित्र असलेले... करिअरमध्येही एकमेकाच्या तोडीस तोड ठरलेले...क्रिकेट विश्वात अनेक रेकॉर्ड मोडणाऱ्या दोघांची परिस्थिती अत्यंत विरुद्ध आहे.

घट्ट धरलेला हात सोडेना, सचिनच्या डोक्यावरुन हात फिरवित राहिला; विनोद कांबळीचे Video पाहून चाहते स्तब्ध  
मुंबई:

रमाकांत आचरेकरांच्या स्मारकाच्या उद्घाटनावेळेसचा सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी सचिन तेंडुलकरचं कौतुक केलंय. एकेकाळी एकमेकांचे घट्ट मित्र असलेले... करिअरमध्येही एकमेकाच्या तोडीस तोड ठरलेले...क्रिकेट विश्वात अनेक रेकॉर्ड मोडणाऱ्या दोघांची परिस्थिती अत्यंत विरुद्ध आहे.

मास्टर ब्लास्टरप्रमाणे अत्यंत प्रतिभावान विनोदच्या करिअरचा घटता स्थर अनेक प्रश्न उपस्थित करतो. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघंही एकेकाळचे आघाडीचे फलंदाज होते. मात्र विनोद कांबळी क्रिकेट सोडून अनेक गोष्टींमध्ये अडकत गेला. त्यामुळे त्याचं क्रिकेट मागे पडलं आणि त्याच्यावर आता ही वेळ आली, असं म्हणतात. 

दोघांनाही रमाकांत सरांचं मार्गदर्शन मिळालं. दोघांवरही त्यांचं निस्सिम प्रेम. दोघांचीही कारकिर्द प्रभावशाली... मात्र रमाकांत सरांच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मोठा मान मिळवून सचिन मध्यभागी बसला होता तर स्टेजच्या शेवटच्या टोकाला पांढरे केस, समवयस्क असतानाही म्हातारा दिसणार विनोद भिरभिरत्या नजरेनं कधी सचिन तर कधी प्रेक्षकांकडे पाहत होता. या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सचिन स्वत: विनोदला भेटायला गेला. वैद्यकीय कारणास्तव विनोदच्या स्मरणशक्तीवरही परिणाम झाल्याचं दिसतय. त्यामुळे सचिन अचानक समोर आल्यानंतर विनोदने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र हा आपला सचिन असल्याचं लक्षात येताच त्याने त्याचा हात घट्ट धरला.

बराच वेळ तो हात सोडेना. त्याला उभं राहताही येत नव्हतं. सचिनने कसाबसा हात सोडवून घेतला आणि स्टेजच्या केंद्रस्थानी राज ठाकरेंच्या शेजारी जाऊन उभा राहिला. तोपर्यंत विनोद सचिनच्या पाठमोऱ्या शरीराकडे पाहत होता. कार्यक्रम संपल्यानंतरही विनोद सचिनच्या जवळ गेला आणि त्याच्या डोक्यावरुन-पाठीवरुन हात फिरवित राहिला.  या सर्व प्रसंगांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकदा यश पचवणंही अवघड असतं असच काहीसं या घटनांवरुन लक्षात येतं.

विनोद कांबळीने आचरेकरांचं आवडतं गाणं गायलं...
रमाकांत आचरेकर सरांच्या आठवणींबद्दल विनोद कांबळीला बोलण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी थरथरत्या हातांनी विनोद कांबळीने माईक हातात घेतला. पण त्याला स्पष्टपणे बोलता येत नव्हतं. त्याची ही अवस्था पाहून साऱ्यांनाच वाईट वाटलं. विनोद म्हणाला, मी शॉर्टमध्येच बोलणार आहे. आचरेकर सरांचं आवडतं गाणं कुणाला माहीत आहे का? आणि त्याने गाणं गायला सुरुवात केली. ‘सरजो तेरा चकराये…'म्हणज तो शेवटी आचरेकर सर लव्ह यू म्हणत भाषण संपवलं.


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com