सचिन @ 51 : सचिन तेंडुलकरच्या 51 अद्भुत गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Happy Birthday Sachin : 24 एप्रिल 1973 रोजी जन्मलेल्या सचिननं 51 वर्ष पू्र्ण केली आहेत. त्यानिमित्तानं सचिनशी संबधित 'या' 51 खास तुम्हाला माहिती हव्यात.

जाहिरात
Read Time: 5 mins
मुंबई:

Happy Birthday Sachin Tendulkar :  भारतामध्ये क्रिकेट हा फक्त खेळ नाही धर्म मानला जातो. या धर्माचा देव आहे सचिन रमेश तेंडुलकर. सचिननं वयाच्या 16 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तो पुढील 24 वर्ष म्हणजेच 2013 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता.

सचिनची बॅटिंग द्रौपदीच्या थाळीसारखी होती. सहजता, सौंदर्य, आक्रमकता, जरब, वर्चस्व, जिद्द, चिकाटी, निग्रह या प्रत्येक गोष्टीचं दर्शन त्याच्या खेळात झालं आहे. त्यामुळेच त्याच्या अनेक इनिंग क्रिकेट फॅन्सच्या ऱ्हदयात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.  

शंभर कोटींपेक्षा जास्त भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन सचिन खेळला. त्याचे खांदे या ओझ्यानं दबले नाहीत. फक्त भारतच नाही तर जगभरातील अनेक तरुण  त्याचा खेळ बघून त्याला आपला आदर्श मानून क्रिकेटकडं वळाली. दोन पिढ्या सचिनचा खेळ पाहून मोठ्या झाल्या. तो निवृत्त झाला त्यावेळी अनेकांना आपल्या आयुष्यातील एक सुंदर कालखंड संपला याची जाणीव झाली. काही जणांचं क्रिकेट पाहणं सचिनच्या निवृत्तीसोबतच थांबलं.

Advertisement


( नक्की वाचा : धोनी, शास्त्री आणि वानखेडे! पुन्हा जागा झाला 13 वर्षांपूर्वीचा इतिहास, Video )

सचिन निवृत्त होऊन आता एक दशकांपेक्षा जास्त कालावधी उलटलाय. त्यानंतरही सचिनची लोकप्रियता कमी झालेली नाही. 24 एप्रिल हा सचिनचा वाढदिवस दरवर्षी क्रिकेट फॅन्स तितक्याच आत्मियतेनं आणि उत्साहानं साजरा करतात.

Advertisement

24 एप्रिल 1973 रोजी जन्मलेल्या सचिननं 51 वर्ष पू्र्ण केली आहेत. त्यानिमित्तानं सचिनशी संबधित 51 खास गोष्टी पाहूया.


1. सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर हे संगीतकार सचिन देव बर्मन यांचे मोठे फॅन होते. त्यांच्या नावावरुच त्यांनी मुलाचं नाव सचिन ठेवलं.
2. सचिन क्रिकेटपटू होण्यात त्याचा मोठा भाऊ अजित तेंडुलकरचा मोठा वाटा आहे. सचिन प्रत्येक इनिंगनंतर त्यावर अजितशी चर्चा करत असे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटच्या इनिंगनंतरही त्यानं हे व्रत जपलं.
3. सचिननं शारदाश्रम शाळेत रमाकांत आचरेकर यांच्याकडं क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं. संपूर्ण नेट सेशनमध्ये एकदाही आऊट झाला नाही तर आचरेकर सर त्याला एक कॉईन भेट देत असतं.
4. सचिन तेंडुलकरनं शाळेतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला त्याच्या येण्याची चाहूल दिली होती. सचिन आणि विनोद कांबळी या जोडीनं हॅरिस शिल्ड स्पर्धेत 1988 साली 664 रन्सची विक्रमी पार्टनरशिप केली होती.

Advertisement

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीनं शालेय क्रिकेटमध्ये विक्रमी पार्टरनरशिप केली होती.


5. जॉन मॅकेन्रो हा टेनिसपटू सचिनचा आयडॉल होता. सचिननं लहाणपणी त्याच्यासारखे केस वाढवले होते. त्याचबरोबर तो मॅकेन्रोसारखे केसाला हेअरबँड लावत असे.
6. सचिननं 1987 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेत वानखेडे स्टेडियमवर बॉल बॉय म्हणून काम केलं आहे.
7. अनेकांना वाचून आश्चर्य वाटेल पण सचिननं पाकिस्तानकडून फिल्डिंग देखील केलीय.1988 साली भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या प्रॅक्टीस मॅचमध्ये त्यानं पाकिस्तानकडून फिल्डिंग केली होती.
8. सचिननं वयाच्या 14 व्या वर्षी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
9. रणजी, दुलिप आणि इराणी ट्रॉफीमधील पदार्पणाच्या सामन्यात सेंच्युरी करणारा सचिन पहिला क्रिकेटपटू आहे.
10. 1987 साली मुंबईच्या संभाव्य रणजी टीममध्ये सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर या दोघांचा समावेश होता.
11. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू हा रेकॉर्ड आजही सचिनच्या नावावर आहे. सचिननं 1989 साली पाकिस्तानविरुद्ध कराचीमध्ये पदार्पण केलं त्यावेळी त्याचं वय 16 वर्ष 238 दिवस होतं.

( नक्की वाचा : आफ्रिदीनं रिझवानची केली ब्रॅडमनशी तुलना! फॅन्सकडून जोरदार शाळा )

12. वन-डे मॅचमधील पहिल्या इनिंगमध्ये सचिन शून्यावर आऊट झाला होता. तर टेस्टमधील पदार्पणातील इनिंगमध्ये त्यानं 15 रन केले.
13. सचिननं वयाच्या 17 व्या वर्षी पहिलं आंतरराष्ट्रीय सेंच्युरी झळकावली. 1990 साली इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये झालेल्या टेस्टमध्ये त्यानं ही कामगिरी केली.
14. सचिननं भारतीय मैदानावरची पहिली सेंच्युरी 1993 साली इंग्लंडविरुद्ध चेन्नईत झळकावली.
15. सचिननं 1994 साली न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डेमध्ये सर्वात प्रथम ओपनिंगला आला.
16. सचिन त्याच्या संपूर्ण टेस्ट कारकिर्दीमध्ये फक्त एकदाच ओपनिंगला खेळला आहे. न्यूझीलंडविरुद्ध 1999 साली अहमदाबादमध्ये झालेल्या टेस्टमध्ये त्यानं भारतीय इनिंगची सुरुवात केली होती. त्या इनिंगमध्ये त्यानं 15 रन केले होते.
17. सचिन तेंडुलकरनं वयाच्या 22 व्या वर्षी अंजली मेहताशी लग्न केलं.24 मे 1995 या दिवशी सचिन आणि अंजलीचं लग्न झालं.

सचिन आणि अंजली यांचा लग्नातील फोटो


18. सचिनचे सासरे आनंद मेहता यांनी सात वेळा नॅशनल ब्रिज चॅम्पियनशिप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
19. सचिनला सारा आणि अर्जुन अशी दोन मुलं आहेत. अर्जुन देखील व्यावसायिक क्रिकेटपटू आहे.
20.   मारुती 800 ही सचिनची पहिली कार होती.
21.  सचिननं त्याच्या अडीच दशकांच्या टेस्ट कारकिर्दीमध्ये कधीही तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग केली नाही.
22. सचिन संपूर्ण टेस्ट कारकिर्दीमध्ये फक्त एकदा स्टंप आऊट झाला आहे. इंग्लंडविरुद्ध 2001 साली झालेल्या टेस्टमध्ये तो या पद्धतीनं आऊट झाला होता.
23.  सचिननं राहुल द्रविडसोबत 20 वेळा सेंच्युरी पार्टनरशिप केली आहे.
24.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 सेंच्युरी करणारा सचिन पहिला क्रिकेटपटू आहे. त्यानं 2000 साली हा रेकॉर्ड केला.
25. टेस्ट क्रिकेटमध्ये 51 सेंच्युरी करणारा सचिन एकमेव क्रिकेटपटू आहे.
26. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 सेंच्युरी करणारा सचिन एकमेव क्रिकेटपटू आहे.
27. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 15921 रन्स करण्याचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहे.
28. 200 टेस्ट मॅच खेळणारा सचिन एकमेव क्रिकेटपटू आहे.

( नक्की वाचा : विराट कोहलीच्या RCB ला अद्याप एकदाही आयपीएल चॅम्पियन का होता आले नाही? )
 

29. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 18426 रन करण्याचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहे.
30. वन-डे क्रिकेटमध्ये पहिली डबल सेंच्युरी देखील सचिननचं झळकावली आहे.
31. सर्वाधिक काळ वन-डे क्रिकेट (22 वर्ष 91 दिवस) खेळण्याचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहे.
32. सचिननं वन-डे क्रिकेटमध्ये 2 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केलीय.
33. सचिन त्याच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये फक्त 1 टी20 इंटरनॅशनल मॅच खेळला.
34. 1 डिसेंबर 2006 झाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिन एकमेव टी20 इंटरनॅशनल खेळला. त्या मॅचमध्ये त्यानं 12 बॉलमध्ये 10 रन केले.
35. सचिननं 6 वन-डे वर्ल्ड कपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं.
36. वन-डे वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक 2278 रन करण्याचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहे.
37. वन-डे वर्ल्ड कपमध्ये 'प्लेयर ऑफ द सीरिज' पुरस्कार मिळवणारा सचिन हा पहिला भारतीय आहे.

38. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थर्ड अंपायरनं आऊट दिलेला सचिन पहिला क्रिकेटपटू आहे.
39. वडा-पाव हे सचिनचं सर्वात आवडतं फास्ट फुड आहे.
40. सचिन तेंडुलकर 1995 साली वर्ल्ड टेल कंपनीसोबत झालेल्या करारानंतर सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू बनला.
41. 2003 साली प्रदर्शित झालेल्या 'स्टम्पड'या हिंदी चित्रपटात सचिननं काम केलं.
42. ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजन सीरिज An Aussie Goes Bolly मध्येही सचिन झळकला आहे.
43. सचिननं 2008 साली मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं.
44. सचिन 2008 ते 2013 या कालावधीमध्ये त्यानं आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं.
45. सचिनच्या नावावर आयपीएलमध्ये एक सेंच्युरी आहे.
46. सचिन तेंडुलकर आयपीएलमधील निवृत्तानंतरही मेंटॉर म्हणून मुंबई इंडियन्सशी निगडीत आहे.
47. सचिन तेंडुलकरची 2013 साली राष्ट्रपतींनी राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली होती.
48. भारतीय वायूसेनेकडून 2010 साली सचिनला ग्रुप कॅप्टन ही मानद रँक देण्यात आली. हा बहुमान मिळवणारा तो पहिलाच क्रिकेटपटू आहे.
49. सचिन तेंडुलकरला 2001 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
50. राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचा मानकरी ठरलेला सचिन पहिला क्रिकेटपटू आहे.
51. सचिन तेंडुलकर हा भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलेला सर्वात तरुण व्यक्ती तसंच एकमेव खेळाडू आहे.