जाहिरात
Story ProgressBack

विराट कोहलीच्या RCB ला अद्याप एकदाही आयपीएल चॅम्पियन का होता आले नाही?

दिग्गज प्लेयर्स, अनुभवी कोचिंग स्टाफ, मैदानात आणि मैदानाबाहेर सतत सपोर्ट करणारी कट्टर आर्मी हे सारं असूनही आरसीबी मेन्स टीमला अद्याप एकदाही आयपीएल विजेतेपद जिंकता आलेलं नाही. 

Read Time: 4 min
विराट कोहलीच्या RCB ला अद्याप एकदाही आयपीएल चॅम्पियन का होता आले नाही?
मुंबई:

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला जगातील सर्वात लोकप्रिय टी20 लीग बनवण्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचे मोठे योगदान आहे. आरसीबी या नावानं प्रसिद्ध असलेल्या या टीमचे जगभरात असंख्य कट्टर फॅन्स आहेत. भारतच नाही तर जगातिक क्रिकेटमधील गेल्या दशकातील सर्वात मोठा चेहरा विराट कोहली हा आरसीबीकडून पहिल्या सिझनपासून खेळतोय. 

विराटचा क्लास, खेळ, रन्स काढण्याची कधीही न संपणारी भूक आणि लोकप्रियता या सर्वांचा आरसीबीला नेहमी फायदा होतो. आरसीबीच्या प्रत्येक मॅचमध्ये मोठ्या संख्येनं त्यांचे फॅन्स टीमला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात असतात. त्यापेक्षा कित्येक पट जास्त टीव्ही समोर बसतात.

दिग्गज प्लेयर्स, अनुभवी कोचिंग स्टाफ, मैदानात आणि मैदानाबाहेर सतत सपोर्ट करणारी कट्टर आर्मी हे सारं असूनही आरसीबीला अद्याप एकदाही आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद जिंकता आलेलं नाही. विशेष म्हणजे आरसीबीच्या महिला टीमनं दुसऱ्याच वर्षी WPL चं विजेतेपद पटकावलंय. त्यानंतर आरसीबी मेन्स टीमच्या अपयशाची अधिक चर्चा होत आहे.

 मुलींकडून शिका! RCB च्या महिला टीमपासून पुरुषांनी काय शिकलं पाहिजे?

कशी आहे कामगिरी?

आरसीबीची टीम आजवर 16 आयपीएल सिझन खेळलीय. त्यामध्ये राहुल द्रविड, केव्हिन पीटरसन, अनिल कुंबळे, डॅनियल व्हिटोरी, विराट कोहली, शेन वॉटसन आणि फाफ ड्यू प्लेसिस या सात जणांनी आत्तापर्यंत कॅप्टनसी केलीय.

गेल्या 16 वर्षात आरसीबीनं 7 वेळा ‘प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला असून तीन वेळा (2009, 11, 16) फायनल गाठलीय. पण, त्यांना प्रत्येक वेळी विजेतेपदानं हुलकावणी दिलीय. त्यामुळे आरसीबीवर ‘चोकर्स' चा टॅग चिकटलाय.

गेल्या 16 सिझनमध्ये आरसीबीनं एकदाही विजेतेपद का पटकावले नाही याची काही महत्त्वाची कारणं आहेत.

विराटवर अतिरिक्त जबाबदारी

विराट कोहली ही आरसीबीची सर्वात मोठी शक्ती आहे. गेल्या 16 वर्षात प्रत्येक सिझनमध्ये विराटची उंची वाढली. पण, त्याबरोबरीनं टीममधील अन्य खेळाडूंना त्यांचा स्तर उंचावता आला नाही.

विराट कोहली-एबी डीव्हिलियर्स-ख्रिस गेल या तिघांवर यापूर्वी आरसीबीची बॅटिंग अवलंबून होती. आता त्याची जागा KGF म्हणजेच विराट- ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ ड्यू प्लेसीवर आहे. 

गेल्या दशकभरात विराटनं टीमचा भार सहन केलाय. विराटवर आरसीबी प्रमाणाच्या बाहेर अवलंबून आहे. त्यामुळे ‘विराटला आऊट केलं की मोठं काम झालं' हो समोरच्या टीमला माहिती असतं.

आयपीएल 2016 ची फायनल हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. सनरायझर्स हैदराबादनं दिलेल्या 209 रन्सचा पाठलाग करताना आरसीबीची स्थिती 1 आऊट 140 अशी भक्कम होती. त्यावेळी विराट आऊट झाला.

विराट आऊट झाल्यानंतरच्या 49 बॉलमध्ये आरसीबीला 5 विकेट्सच्या मोबदल्यात फक्त 60 रन करता आले आणि घरच्या मैदानावर ट्रॉफी उंचावण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.

पहिल्याच मॅचमध्ये विराटनं 'हे' काय केलं? फॅन्स संतापले...


भारतीय बॅटर्सचा अभाव

आयपीएल स्पर्धा जिंकायची असेल तर टीममध्ये चांगले भारतीय बॅटर्स आवश्यक आहेत. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स या टीमनी ते दाखवून दिलंय. आरसीबीला विराटचा अपवाद वगळता तसा भारतीय बॅटर मिळालेलाच नाही.

आरसीबीकडून एक हजार रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट हा एकमेव भारतीय आहे. विराटनंतर राहुल द्रविड (898) या भारतीय बॅटरनं आरसीबीकडून सर्वात जास्त रन्स काढलेत. 

द्रविड 2010 साली आरसीबीकडून शेवटचा सिझन खेळला. मागच्या 13 वर्षात विराटशिवाय एकाही भारतीय खेळाडूला त्याला मागं टाकता आलेलं नाही. हे एकच तथ्य आरसीबीच्या अपयशावर नेमकं बोट ठेवण्यास पुरेसं आहे. 

केएल राहुल, देवदत्त पडिक्कल ही या नावांचा या यादीमध्ये समावेश होऊ शकला असता पण, त्यांना मेगा ऑक्शनमध्ये पुन्हा खरेदी केलं नाही.  

नव्या रेकॉर्डनंतर 'ती' गोष्ट आठवून ऋतुराज भावुक, धोनीबद्दल म्हणाला...


हुकमी बॉलर्सचा अभाव

एखादी मोठी स्पर्धा जिंकायची असेल तर बॉलिंग भक्कम असावी लागते. आरसीबीची टीम ही नेहमीच दिग्गज बॅटर्ससाठी ओळखली जाते. विराट, गेल, डीव्हिलियर्स, वॉटसन, मॅकलम, मॅक्सवेल, ड्यू प्लेसिस, डी कॉक,  राहुल द्रविड, केएल राहुल, युवराज सिंह, दिनेश कार्तिक, असे अनेक दिग्गज  आरसीबीकडून खेळले आहेत. 

आरसीबीला अद्यापही सातत्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या बॉलर्सचा सापडलेला नाही. चिन्नास्वामीचे पिच हे नेहमीच बॉलर्ससाठी आव्हानात्मक ठरलंय. कितीही मोठा स्कोअर इथं चेस होऊ शकतो. त्यामुळे आरसीबीच्या बॉलर्सना पिचचा फायदा मिळालेला नाही.

आरसीबीला हुकमी डेथ ओव्हर स्पेशालिस्टची कमतरता अनेकदा जाणवलीय. हर्षल पटेल आणि जॉश हेझलवूडनं काही काळा आशा जागवली होती. पण, आता हे दोघंही या सिझनमध्ये आरसीबीसोबत नाहीत. त्यामुळे टीम मॅनेजमेंटला पुन्हा एकदा मोठा डोंगर सर करावा लागणार आहे.

ऑक्शनमधील चुका

आयपीएल चॅम्पियनशिप जिंकण्याची सुरुवात ही ऑक्शन टेबलपासूनच होते. मुंबई, सीएसके आणि गुजरात टायटन्सनही ते दाखवून दिलंय. या टीम ऑक्शनमध्ये नेमका फोकस ठेवून उतरतात. त्यानुसार प्लेयर्सची खरेदी करतात.

आरसीबीनं अनेकदा इमोशन्सच्या आधारावर ऑक्शनमध्ये निर्णय घेतले हा क्रिकेट तज्ज्ञांचा त्यांच्याबाबत आक्षेप आहे. त्यामुळे संतुलीत टीम त्यांना तयार करता आलेली नाही. ऑक्शनमधील चुकांमुळे आयपीएलमधील पहिला बॉल पडण्यापूर्वीच आरसीबी बॅकफुटवर गेलेली असते.

टीम मॅनेजमेंटचं अपयश

खेळाडूंकडून सर्वोत्तम खेळ करुन घेणे हे टीम मॅनेजमेंटचं काम असतं. त्यांना त्यासाठी पोषक वातावरण देणे ही मॅनेजमेंटची जबाबदारी असते. शेन वॉटसन, केएल राहुल, क्विंटन डी कॉक यासारख्या दिग्गज खेळाडूंचा आरसीबीला नीट वापर करता आला नाही.

आरसीबीकडून सातत्यानं विकेट्स घेणाऱ्या युजवेंद्र चहलला त्यांनी रिटेन केलं नाही. टीममध्ये सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम ही खेळाडूंच्या कामगिरीवर झालाय. त्यामुळेच ‘Ee Sala Cup Namde' ही आरसीबी मेन्स टीमच्या फॅन्सची घोषणा अद्याप सत्यात उतरलेली नाही

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination