Shivam Dube Travel From Train: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी रात्री उशिरापर्यंत विजयाचा जल्लोष सुरू होता. टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळे फक्त अहमदाबादच नाही तर संपूर्ण देश क्रिकेटमय झाला होता. या विजयाचा एक महत्त्वाचा शिल्पकार होता शिवम दुबे. त्याने स्लॉग ओव्हर्समध्ये केवळ 8 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्स मारत नाबाद 26 रनची वादळी खेळी केली होती. स्टँडमधील हजारो प्रेक्षक 'दुबे-दुबे' असा जयघोष करत होते. पण हाच स्टार खेळाडू काही तासांनंतर आपली ओळख लपवून एका वेगळ्याच प्रवासाला निघाला होता.
विमानतळावर होणारी फॅन्सची गर्दी आणि कॅमेऱ्यांचे फ्लॅश टाळण्यासाठी शिवम दुबेने एक असा निर्णय घेतला जो कोणालाही पटणारा नव्हता. मुंबईला जाण्यासाठी एकही फ्लाईट उपलब्ध नसल्याने त्याने चक्क ट्रेनने जाण्याचे ठरवले. अंगात चॅम्पियन असल्याचा कोणताही बडेजाव न ठेवता, त्याने आपली पत्नी अंजुम आणि एका मित्रासोबत अहमदाबाद-मुंबई सयाजी एक्सप्रेसचे 'थर्ड एसी'चे तिकीट काढले. 4 वर्षांचा मुलगा अयान आणि 2 वर्षांची मुलगी मेहविश मुंबईत घरी त्याची वाट पाहत होते, त्यामुळे त्याला लवकरात लवकर घरी पोहोचायचे होते.
( नक्की वाचा : T20 WC 2026: BCCI चा खजिना उघडला! 131 कोटींच्या बक्षीसाची अशी होणार विभागणी; कुणाला किती मिळणार? वाचा सविस्तर )
अशी लपवली स्वत:ची ओळख
हा प्रवास सोपा नव्हता. रेल्वे स्टेशनवर किंवा ट्रेनमध्ये कोणी ओळखले असते, तर चाहत्यांची गर्दी आवरणे कठीण झाले असते. त्यामुळे शिवमने डोक्यावर टोपी, चेहऱ्यावर मास्क आणि पूर्ण बाह्यांचा टी-शर्ट घालून स्वतःला पूर्णपणे झाकून घेतले होते. पहाटे 5:10 ची ट्रेन असल्याने प्लॅटफॉर्मवर गर्दी नसेल असा त्याचा अंदाज होता, पण तिथेही अनेक चाहते भारतीय जर्सी घालून विजयाचा आनंद साजरा करत होते. अखेर रेल्वे सुटायला फक्त 5 मिनिटे उरली असताना शिवमने डब्यात धावत प्रवेश केला आणि थेट वरच्या बर्थवर जाऊन बसला.
जेव्हा टीटीने विचारला प्रश्न
प्रवासादरम्यान जेव्हा तिकीट तपासनीस म्हणजेच टीटी तिथे आला, तेव्हा त्याने चार्टवर 'शिवम दुबे' हे नाव पाहिले. त्याने कुतूहलाने विचारले, "हा कोण आहे, तो क्रिकेटर शिवम दुबे का?" यावर शिवमची पत्नी अंजुमने अजिबात न डगमगता उत्तर दिले की, "नाही, नाही. तो इथे कशाला येईल?" अंजुमच्या या उत्तरामुळे टीटीचा संभ्रम दूर झाला आणि तो पुढे निघून गेला. संपूर्ण 8 तासांच्या प्रवासात शिवमने आपली ओळख उघड होऊ दिली नाही. अगदी वॉशरूमला येताना-जातानाही त्याने कोणाचे लक्ष वेधले नाही.
(नक्की वाचा : Sanju Samson चा 'देवमाणूस' सचिन तेंडुलकर! बॅट चालत नव्हती तेव्हा देवानेच दिला आधार; भावूक संजूनं सारं सांगितलं )
बोरीवलीत पोलिसांची घेतली मदत
ट्रेनचा प्रवास सुरळीत झाला असला तरी, दिवसा बोरीवली स्टेशनवर उतरणे हे मोठे आव्हान होते. तिथली गर्दी पाहून आपली ओळख उघड होईल अशी भीती शिवाला वाटत होती. अखेर त्याने मदतीसाठी पोलिसांना फोन केला. सुरुवातीला पोलिसांनाही वाटले की तो एअरपोर्टवर उतरत आहे, पण जेव्हा त्याने सांगितले की तो रेल्वेने येत आहे, तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले.
पोलिसांनी दिलेल्या सुरक्षा कवचामुळे शिवम दुबे सुखरूप आणि कोणत्याही गोंधळाशिवाय घरी पोहोचला. मैदानात सिक्सर्सचा पाऊस पाडणाऱ्या या खेळाडूचा हा साधेपणा सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world