India vs England Test Series: टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) 7 मे रोजी अचानक टेस्ट फॉरमॅटमधून रिटायर होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर टीम इंडियाचा नवा कॅप्टन कोण ही चर्चा सुरु आहे? भारतीय टीम पुढच्या महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचा नव्या कॅप्टनसह मैदानात उतरेल. भारत आणि इंग्लंड यांच्याच पाच टेस्टची सीरिज होणार आहे. त्याची सुरुवात 20 जून रोजी होईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टीम इंडियाच्या कॅप्टनपदासाठी शुबमन गिलचं (Shubman Gill) नाव आघाडीवर आहे. तो कॅप्टन होणे जवळपास नक्की मानलं जात आहे. पण, अनेक दिग्गजांनी जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) पसंती दिली आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या एका वृत्तानुसार, शुभमन गिल अलीकडेच टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) घरी जेवणासाठी गेला होता. ही भेट जवळपास चार ते पाच तास चालली. वृत्तानुसार, शुभमन गिलची कॅप्टनपदी लवकरच घोषणा होईल.
( नक्की वाचा : इंग्लंड दौऱ्यासाठी India A टीमची घोषणा, यशस्वी जैस्वाल नाही तर 'हा' खेळाडू आहे कॅप्टन ! )
का सुरु झाली चर्चा?
भारतीय क्रिकेटमध्ये 'कॅप्टन गिल युग' सुरु होणार असल्याचे संकेत काही घडामोडींवरून मिळत आहेत. आयपीएल 2025 सिझनमध्ये गुजरात टायटन्सची टीम कॅपिटल्सविरुद्ध खेळण्यासाठी दिल्लीत आली होती, त्यावेळी गिल दुपारच्या जेवणासाठी हेड गौतम गंभीरच्या घरी गेला होता. कथितरित्या दोघांमध्ये चार ते पाच तास चर्चा झाली.
नंतर,6 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध गुजरात टायटन्सच्या सामन्यानंतर, निवड समितीचा अध्यक्ष अजित आगरकर यांनीही गिलसोबत चर्चा केली. बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, निवड समिती दीर्घकालीन कर्णधार बदलाची योजना आखत आहे आणि गिलला आदर्श उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.
बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले, "त्याने ज्या प्रकारे गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले आहे, त्यात त्याने प्रभावी नेतृत्व गुण दाखवले आहेत, ज्यामुळे ते या सिझनमध्ये पॉईंट टेबलमध्ये अव्वल आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नवा सिझन (2025-27) आता सुरु होत आहे. त्या काळात गिलला कॅप्टन म्हणून संधी देण्यासाठी निवड समिती उत्सुक आहे. त्याच्याभोवती एक तरुण टीम तयार करण्याची योजना आहे. त्यामुळेच त्याची चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.'
गिलनं आत्तापर्यंत 32 टेस्टमध्ये 35.05 च्या सरासरीनं 1,893 रन्स केले आहेत. त्यामध्ये पाच सेंच्युरी आणि सात हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.