Suryakumar Yadav's Stunning Catch: भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 चं विजेतेपद पटकावलं आहे. टीम इंडियानं 2007 साली दक्षिण आफ्रिकेत झालेला टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर गेली 17 वर्ष भारताला या स्पर्धेच्या विजेतेपदानं हुलकावणी दिली. रोहित शर्माच्या कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या टीमनं 17 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.
टीम इंडियाला शेवटच्या ओव्हरमध्ये वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 16 रन्सनं संरक्षण करायचं होतं. दक्षिण आफ्रिकेचा धोकादायक डेव्हिड मिलर मैदानात होता. त्यामुळे सामना आफ्रिकेच्या बाजूनं झुकला होता. हार्दिक पांड्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये अचूक बॉलिंग करत फक्त 8 रन दिले. त्यानं ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर डेव्हिड मिलरला आऊट केलं. या विकेटचं सर्व श्रेय हे सूर्यकुमार यादवचं होतं. त्यानं बाऊंड्री लाईनवर जबरदस्त फिल्डिंग करत मिलरचा कॅच पकडला. सूर्यानं हा कॅच पकडल्यानंच टीम इंडियाचे हात वर्ल्ड कपला लागले.
ट्रेंडींग बातमी - Hardik Pandya : व्हिलन ते हिरो! सारं काही विरोधात असताना हार्दिकनं कसा जिंकून दिला भारताला वर्ल्ड कप?
सूर्यानं पकडला जबरस्त कॅच
हार्दिक शेवटची ओव्हर टाकायला आला त्यावेळी डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता. भारत आणि टी20 वर्ल्ड कपचं विजेतेपद यामध्ये फक्त डेव्हिड मिलरचा अडथळा होता. हार्दिकनं ऑफ स्टम्पच्या बाहेर लो फुल टॉस बॉल टाकला. मिलरनं तो बॉल लाँग ऑफच्या दिशेनं टोलावला. मिलरचा फटका बाऊंड्री लाईन पार करणार असंच वाटत होतं पण, सूर्यकुमार यादवर बाऊंड्रीवर जबरदस्त कॅच घेतला.
सूर्यानं या कॅच दरम्यान त्याचं संतुलन गमावलं होतं. त्यावेळी त्यानं प्रसंगावधान दाखवून बॉल उंच फेकला आणि पुन्हा एकदा कॅच घेतला. भारताच्या विजयात हा कॅच अतिशय महत्त्वाचा ठरला.
गेली सहा महिने क्रिकेट फॅन्सचं टार्गेट असलेल्या हार्दिक पांड्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला 16 रन बनवू दिले नाहीत. दक्षिण आफ्रिकेला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 169 रन करता आले. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्याचबरोबर भारतीय टीमनं हेड कोच राहुल द्रविडलाही विजेतेपदासह निरोप दिला.