Team India Travel Story: टीम इंडियानं सर्व प्रतिस्पर्धी टीमचा पराभव करत टी20 वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं. त्यानंतर भारतीय क्रिकेटचे दिग्गज वेस्ट इंडिजमधील 'बेरिल वादळा'वर मात करुन मायदेशी परतले आहेत. भारतीय खेळाडू विजेतेपदाच्या ट्रॉफीसह मायदेशी परतल्यानं फॅन्स प्रचंड आनंदी आहेत. टीम इंडिया आज (गुरुवार 4 जुलै) सकाळी एअर इंडियाच्या विशाल बोईंग 777 या विमानानं राजधानी दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाली. त्यानंतर संपूर्ण टीमनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
टीम इंडियाचा बार्बाडोस ते दिल्ली हा प्रवास मोठा विलक्षण आहे. टी20 वर्ल्ड कप संपताच बार्बाडोसमध्ये बेरिल वादळ दाखल झालं. या चक्रीवादळाचं भयंकर स्वरुप पाहून स्थानिक सरकारनं सर्व विमानांची उड्डाण रद्द केली. काही दिवसांनी हवामान स्वच्छ झाल्यानंतर भारत सरकारनं खेळाडूंना परत आणण्यासाठी खास व्यवस्था केली.
बोईंग 777 विमानाची खासियत
एअर इंडियाचं हे खास विमान लांबच्या प्रवासासाठी सर्वोत्तम मानलं जातं. या विमानात एकाचवेळी जवळपास 300 ते 400 जण आरामात बसू शकतात. या विमानात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयी आहेत. विमानातील लेटेस्ट उपकरणामुळे यामधून प्रवास अत्यंत आरामात होतो.
बोईंग 777 मध्ये एअर इंडियाचे अव्वल पायलट आणि क्रू कामावर असतात. हे सर्व कर्मचारी विमानाचा सर्वोच्च दर्जा कायम राहील याची काळजी घेतात.
( नक्की वाचा : भारतीय खेळाडूंच्या कार्यक्रमापूर्वीच राजकारण सुरु, ठाकरेंनी उपस्थित केला गुजरातचा मुद्दा )
विमानाला मिळालं खास नाव
भारतीय टीमला बार्बाडोसहून घेऊन आलेल्या या विमानाला खास नाव देण्यात आलं आहे. या विमानाला एअर इंडिया चॅम्पियन्स 24 विश्व कप हे नाव देण्यात आलं आहे. बार्बाडोसच्या वेळेनुसार या विमानानं बुधवारी सकाळी साधारण 4 वाजून 50 मिनिटांनी उड्डाण घेतलं. दिल्लीमध्ये आज (गुरुवार) सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी दाखल झालं.