Aaditya Thackeray on Team India Victory Parade : T20 वर्ल्ड कप विजेती भारतीय क्रिकेट टीम मायदेशात परतलीय. नवी दिल्ली विमानतळावर सर्व फॅन्सनी टीमचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाची भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत मोदींनी भारतीय टीममधील सर्व खेळाडूंशी संवाद साधला. त्याचबरोबर टीमच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर भारतीय टीम मुंबईकडं रवाना झालीय. मुंबईत टीम इंडियाची भव्य मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर भारतीय टीमचा गौरव कार्यक्रम होईल. जगभरातील भारतीय फॅन्सचं लक्ष या कार्यक्रमाकडं लागले आहेत. हजारो मुंबईकर हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवणार आहेत. भारतीय क्रिकेटचा प्रत्येक फॅन या कार्यक्रमासाठी उत्सुक आहे.
( नक्की वाचा : पंतप्रधान मोदींनी घेतली टीम इंडियाची भेट, रोहित-द्रविडसह उंचावली ट्रॉफी, Video )
भारतीय खेळाडूंच्या मुंबईतील भव्य कार्यक्रमाआधीच राजकारण सुरु झालं आहे. मुंबईत ओपन बसमधून टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघणार आहे. ही ओपन बस गुजरातवरुन का मागवली? असा प्रश्न शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारलाय.
महाराष्ट्रीयन खेळाडूंचा मुंबईत सत्कार
टी20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमचे सदस्य असलेल्या 4 महाराष्ट्रीयन खेळाडूंचा विधीमंडळात सत्कार होणार आहे. राज्य सरकारनं टीम इंडियाती मुंबईकर खेळाडूंचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैयस्वाल हे चार मुंबईकर खेळाडू वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीममध्ये होते. तर टीम इंडियाचे बॉलिंग कोच पारस म्हांब्रे देखील मुंबईकर आहेत. या सर्वांचा विधीमंडळात सत्कार केला जाणार आहे. अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे या खेळाडूंचा सत्कार विधीमंडळात होईल. सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world