आयपीएल 2024 रंगात आले असतानाच टी20 वर्ल्ड कपचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत जून महिन्यात वर्ल्ड कप होणार आहे. आयसीसीनं या वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर करण्यासाठी 1 मे ही डेडलाईन दिली आहे. आयपीएलमध्ये काही नवोदीत खेळाडू चमकदार कामगिरी करतायत. पण, वर्ल्ड कपसाठी टीम निवडताना नवे प्रयोग करण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाच निवड समिती पसंती देईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
कुणामध्ये स्पर्धा?
गिलनं या आयपीएलमध्ये जैस्वालपेक्षा जास्त रन्स केले आहेत. त्यानंतरही गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यानं दमदार कामगिरी करणाऱ्या जैस्वालच्या नावावर सहज फुली मारणं शक्य नाही. त्याचबरोबर टॉप ऑर्डरमधील एकमेव डावखुरा फलंदाज ही बाब देखील जैस्वाललाठी अनुकूल आहे. निवड समितीनं या दोघांचीही निवड केली तर रिंकू सिंह किंवा शिवम दुबे या फिनशर्सपैकी फक्त एकालाच वर्ल्ड कपचं तिकीट मिळेल.
राहुल आणि इशान यांनी टॉप ऑर्डरमध्येच बॅटिंग केलीय. त्यामुळे ते मीडल किंवा लोअर ऑर्डरमध्ये कशी कामगिरी करतील हा निवड समितीच्या बैठकीत चर्चेचा मुद्दा असेल.
11 वर्षांनंतर एक गोष्ट घडली आणि IPL ला BCCI कडून परवानगी मिळाली
टीममधील राखीव स्पिनरच्या जागेसाठी अक्षर पटेल, युझवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई यांच्यात स्पर्धा आहे. या तिघांमध्ये फक्त बॉलिंगमधील स्किलच्या जोरावर चहल इतरांच्या पुढं आहे. पण, गेल्या काही सीरिजमध्ये निवड समितीनं त्याच्याकडं दुर्लक्ष केल्यानं त्याची वर्ल्ड कपसाठी निवड अनिश्चित मानली जातीय. तर, अक्षर पटेलचा त्याचा बॅटिंगमधील कौशल्यामुळंही विचार होऊ शकतो.
कुणाची जागा फिक्स?
हार्दिक पांड्याच्या फॉर्मबाबत सध्या बरीच चर्चा होत असली तरी त्याची वर्ल्ड कपसाठी जागा निश्चित मानली जातीय. त्याचबरोबर विराट कोहलीची टीममधील निवड ही देखील फक्त औपचारिकता आहे. हार्दिक आणि विराटसह कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव या दहा जणांची टी20 वर्ल्ड कप टीममधील जागा निश्चित मानली जातीय.