इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल या क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील खेळाडू धडपड करतात. टीम खरेदीपासून प्रत्येक लहान - मोठ्या गोष्टींसाठी स्पॉन्सर्समध्ये रांग लागते. क्रिकेटच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत लीगमध्ये आता आयपीएलचा समावेश आहे.
आयपीएलचा पहिला सिझन 2008 साली पार पडला. पण त्याचा आराखडा 1996 सारीच तयार होता. आयपीएल निर्माते ललित मोदी यांनी हा आराखडा तयार केला होता.
मोदींनी तेव्हा इएसपीएन या वाहिनीसोबत करार करत ही लीग तयार केली होती. अमेरिकेतील बिझनेस स्कूलमध्ये शिकलेल्या ललित मोदींनी शहराची टीम असलेल्या स्पर्धेची संकल्पना बीसीसीआयसमोर मांडली होती. बीसीसीआयनं त्याला मान्यता दिली पण ती तेंव्हा पुढं जाऊ शकली नाही.
विराट कोहलीच्या RCB ला अद्याप एकदाही आयपीएल चॅम्पियन का होता आले नाही?
काय होता टर्निंग पॉईंट?
त्यानंतर 11 वर्षांनी म्हणजेच 2007 साली संपूर्ण क्रिकेट विश्व बदललं होतं. T20 क्रिकेटचं महत्त्व वाढलं होतं. झी समूहांना हे महत्त्वं ओळखून इंडियन क्रिकेट लीगची ( ICL) निर्मिती केली.
आयसीएलमध्ये अनुभवी तसंच नवोदित खेळाडूंना करारबद्ध करण्यात आलं होतं. कपिल देव, किरण मोरे, संदीप पाटील हे दिग्गज क्रिकेटपटू आयसीएलमध्ये दाखल झाले. भारतीय क्रिकेटमधील बीसीसीआयच्या वर्चस्वलाच हे एकप्रकारे आव्हान होतं. बीसीसीआयनं आयसीएलची गांभीर्यानं दखल घेतली.
आयसीएल बेकायदेशीर असल्याचं जाहीर केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंवर बंदी घातली. त्यांना संघटनेचं कोणतंही मैदान मिळणार नसल्याची घोषणा केली.
आयसीएलनं बीसीसीआयसमोर गंभीर आव्हान उभं केलं होतं त्यावेळी ललित मोदी बीसीसीआयचे उपाध्यक्ष होते. त्यांनी पुन्हा एकदा आपली कल्पना बोर्डासमोर मांडली. आयसीएलची सुरुवात हा आयपीएल निर्मितीमधील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला.
मोदींनी कशी केली तयारी?
बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनी 10 सप्टेंबर 2007 रोजी आयपीएलला मान्यता दिली. बीसीसीआयकडून लीगला आर्थिक पॅकेजही दिलं.
ललित मोदींनी जगभरातील क्रिकेट बोर्डाशी संपर्क साधत त्यांच्या देशातील खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळू देण्यासाठी वाटाघाटी केल्या. इंग्लंड वगळता टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांच्या बोर्डांनी त्याला मान्यता दिली.
दक्षिण आफ्रिकेत 2007 साली T20 वर्ल्ड कप झाला. महेंद्रसिंह धोनीच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावले. भारतामध्ये T20 क्रिकेटची लोकप्रियता यामुळे वाढली. आयपीएलला याचा फायदा झाला.
धोनी, शास्त्री आणि वानखेडे! पुन्हा जागा झाला 13 वर्षांपूर्वीचा इतिहास, Video
कसं होतं पहिल्या सिझनचं स्वरुप?
पहिल्या आयपीएल सिझनमध्ये पाकिस्तानचे क्रिकेटपटूही सहभागी झाले. मुकेश अंबानी यांनी मुंबई, विजय मल्ल्यानं बेंगळुरू, शाहरुख खाननं कोलकाता टीमची खरेदी केले, प्रिती झिंटा पंजाब तर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा राजस्थान टीमचे सहमालक बनले.
जगभरातील खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार किमान वेतनाची रक्कम निश्चित करण्यात आली. त्यांची लिलावाच्या माध्यमातून सर्व फ्रँचायझींनी खरेदी केली.
काही भारतीय खेळाडूंचं त्यांच्या शहरांशी घट्ट नातं होतं. त्यामुळे त्यांचा लिलावात समावेश न करता त्यांना टीमचा आयकॉन करण्यात आलं. त्यामुळे सचिन तेंडुलकर - मुंबई इंडियन्स, राहुल द्रविड – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु, सौरव गांगुली – कोलकाता नाईट रायडर्स, वीरेंद्र सेहवाग – दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि युवराज सिंह – किंग्ज इलेव्हन पंजाब या टीमचे आयकॉन बनले.
पहिल्या सिझनमध्ये आठ टीम खेळल्या. शेन वॉर्नच्या कॅप्टनसीमध्ये खेळणा-या राजस्थान रॉयल्सनं महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करत पहिल्या सिझनचं विजेतेपद पटकावले.
क्रिकेट विश्वातील एका नव्या युगाची सुरुवात झाली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world