मॅच संपल्यानंतर अनेकदा मैदानात खेळाडू मोबाईलवर बोलत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेषत: आयपीएल (IPL) दरम्यान या प्रकारचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील. मॅच संपल्यानंतर खेळाडू फक्त मोबाईलवरुन बोलत नाहीत तर व्हिडिओ आणि रिल देखील बनवतात. मॅच संपल्यानंतर लगेच खेळाडूंच्या हातात मोबाईल कसा? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण खेळाडूंच्या मोबाईल फोन वापराबाबत आयसीसीचे कडक नियम आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खेळाडू तसंच अधिकाऱ्यांनी मोबाईल फोन किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वापर कधी करावा याबाबत आयसीसीच्या भ्रष्टाचार निर्मुलन शाखेची खास आचारसंहिता आहे. सध्या सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्येही (T20 World Cup 2024) ही आचारसंहिता लागू आहे.
आयसीसीच्या या विषयातील कोड ऑफ कंटक्टमधील नियम 2.2.12 नुसार खेळाडूंना मॅचच्या अधिकृत भागात (PMOA) प्रवेश करण्यापूर्वी एक सुरक्षित लॉकर किंवा साहित्य ठेवण्यासाठी एखाद्या जागेची सुविधा देण्यात येते. या नियमानुसार सर्व खेळाडू आणि स्टाफला (काही अपवाद वगळता) PMOA मध्ये प्रवेश करण्यापूर्वी मोबाईल फोन लॉकरमध्ये जमा करणे अनिवार्य आहे.
( नक्की वाचा : USA विरुद्ध टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा होणार पत्ता कट! विराटबाबतही मोठी बातमी )
कुठे असतात निर्बंध?
कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या दरम्यान दोन्ही टीमचे ड्रेसिंग रुम, खेळाडू मॅच पाहण्यासाठी बसतात ती जागा (डगआऊट), अंपायर आणि रेफ्रीकडून वापरण्यात येणाऱ्या ऑपरेशनल रुमचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर खेळाडू, अंपायर्स, रेफ्री यांच्या डायनिंग रुममध्येही मोबाईल वापरण्यास आयसीसीनं मनाई केलीय.
कधी जमा केला जातो मोबाईल?
मॅचपूर्वी PMOA भागात प्रवेश करण्यापूर्वी टीम मॅनेजरकडून खेळाडू आणि स्टाफचे मोबाईल फोन जमा केले जातात. साधारत: टीम बसमधून उतरल्यानंतर स्टेडियमममध्ये एन्ट्री करण्यापूर्वी गेटवर हे काम केलं जातं. त्यानंतर टीम मॅनेजर हे सर्व फोन लॉकरमध्ये जमा करतात. मॅच संपल्यानंतर संबंधितांना त्यांचे मोबाईल फोन दिले जातात. ही आचारसंहिता रणजी स्पर्धेसह सर्व देशांतर्गत क्रिकेट सामन्यांना लागू आहे.