रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या टीम इंडियाच्या दिग्गजांनी काही दिवसापूर्वी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांच्यापाठोपाठ भारतीय क्रिकेटमधील आणखी एका दिग्गजानं निवृत्तीची घोषणा केली आहे.
2011 मधील वन-डे वर्ल्ड कप विजेत्या टीममधील खेळाडू पीयूष चावला यानं क्रिकेटमधील सर्व प्रकारतून निवृत्ती (Piyush Chawla Retires From International Cricket) जाहीर केली आहे. चावला 2011 प्रमाणेच 2007 मधील T20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचाही सदस्य होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
36 वर्षांच्या चावलानं इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. चावलाने 2006 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो 2012 साली शेवटचा भारतीय जर्सीत दिसला होता.
त्यानंतरही तो आयपीएलमध्ये खेळत होता. तो गेल्या वर्षापर्यंत आयपीएलमध्ये सक्रीय होता. पण, 2025 च्या आयपीएल ऑक्शनमध्ये त्याला कुणीही खरेदी केले नाही. त्यानंतर चावलाने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. 'कृतज्ञतेने हा अध्याय संपवत आहे!! खेळाच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत आहे, या सुंदर प्रवासात तुमच्या पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.' अशी भावनिक पोस्ट करत त्यानं निवृत्ती जाहीर केली.
चावलाने 2008 साली आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो 2019 पर्यंत आयपीएलचा नियमित खेळाडू होता. त्यानं त्याच्या कारकिर्दीमध्ये पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या चार फ्रँचायझीचं प्रतिनिधित्व केलं. तो 2 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या केकेआरच्या टीमचा सदस्य होता.
( नक्की वाचा : IPL 2025 Final : साई सुदर्शन नाही तर सूर्यकुमारला मिळाला 'प्लेयर ऑफ द सीरिज' पुरस्कार, काय आहे कारण? )
चावलानं टीम इंडियाकडून 3 टेस्ट, 25 वनडे आणि 7 टी-20 इंटरनॅशनल मॅच खेळल्या. त्यामध्ये त्यानं एकूण 43 विकेट्स घेतल्या.