Ravindra Jadeja Instagram Post : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. 2017 नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. पाकिस्तान आणि दुबईत होणाऱ्या या स्पर्धेसाठी निवड समितीनं टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. या टीममध्ये कुणाचा समावेश होणार? कुणाची संधी हुकणार? याची फॅन्समध्ये चर्चा सुरु आहे. त्याचवेळी टीम इंडियातल्या एका दिग्गज खेळाडूनं निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टनं ही चर्चा सुरु झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महान ऑफ स्पिनर आर. अश्विननं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अचानक निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला होता. अश्विनचा खास सहकारी आणि टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजानं निवृत्तीचे संकेत दिले आहेत. जडजेजानं इन्स्टाग्राम पोस्टवर त्याच्या टेस्टमधील जर्सीचा फोटो टाकला आहे. या पोस्टनंतर जडेजा लवकरच निवृत्त होणार अशी चर्चा सुरु आहे.
टीम इंडियानं गेल्या वर्षी T20 वर्ल्ड कप जिंकला. त्या चॅम्पियन टीमचा जडेजा सदस्य होता. भारताच्या विजेतेपदानंतर रोहित शर्मा, विराट कोहलीसह रविंद्र जडेजानंही आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 36 वर्षांचा जडेजा सध्या टेस्ट आणि वन-डे क्रिकेट खेळतोय. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया सीरिजमध्येही तो टीम इंडियाचा सदस्य होता.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निराशा
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली सर्वांचं लक्ष्य होते. पण, या सीरिजमध्ये जडेजाची कामगिरीही साधारण होता. त्याला 3 टेस्टमध्ये फक्त 4 विकेट्स मिळाल्या. तसंच त्यानं बॅटनं 27 च्या सरासरीनं 135 रन्सचं योगदान दिलं होतं.