Vaibhav Suryavanshi Under 19 World Cup Final 2026: टीम इंडियाचा 14 वर्षांचा छोटा सुपरस्टार वैभव सूर्यवंशीनं पुन्हा एकदा इतिहास रचलाय. प्रत्येक स्पर्धेत आपल्या बॅटनं सर्वांना चकित करणाऱ्या वैभवनं अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भीम पराक्रम केला. हरारेमध्ये इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या फायनलमध्ये वैभवनं फक्त 55 बॉलमध्ये शानदार सेंच्युरी झळकावली.
विक्रमी सेंच्युरी
अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीने वादळी बॅटिंग करत इतिहास रचला आहे. त्याने केवळ 55 बॉलमध्ये 8 चौकार आणि 8 उत्तुंग सिक्स मारत आपली सेंच्युरी पूर्ण केली. वैभवने अल्बर्टने टाकलेल्या डावातील 20 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर सिंगल घेतला आणि सेंच्युरी पूर्ण या सामन्यात भारताने टॉस जिंकून आधी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता जो वैभवने सार्थ ठरवला आहे.
वैभवचा सेंच्युरीनंतरही धडाका सुरुच होता. त्याची आक्रमक बॅटिंग पाहून तो फायनलमध्ये डबल सेंच्युरी करेल असंच सर्वांना वाटत होतं. पण तो 175 वर आऊट झाला. त्यानं फक्त 80 बॉलमध्ये 15 फोर आणि 15 सिक्सच्या मदतीनं 175 रन्स केले. म्हणजेच त्यानं फक्त 30 बॉलमध्ये 175 पैकी 150 रन्स केले आहेत.
रेकॉर्ड्सचा पाऊस
या शतकी खेळीसोबतच वैभव सूर्यवंशीने रेकॉर्ड्सचा पाऊस पाडला आहे. अंडर 19 वर्ल्ड कपच्या एकाच एडिशनमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आता वैभवच्या नावावर जमा झाला आहे. त्याने 14.1 ओव्हरमध्ये फिरकीपटू फरहान अहमदच्या बॉलवर लॉन्ग ऑफच्या वरून सिक्स मारत डेवाल्ड ब्रेविसचा रेकॉर्ड मोडीत काढला. बेबी एबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या ब्रेविसने 2022 मध्ये 6 सामन्यात 20 सिक्स मारले होते, पण वैभवने या स्पर्धेत त्याला मागे टाकले आहे.