Who is Jemimah Rodrigues : डी. वाय. पाटील स्पोर्ट्स ॲकॅडमी, नवी मुंबई येथे झालेल्या आयसीसी महिला ODI वर्ल्ड कप 2025 च्या सेमीफायनलमध्ये (India vs Australia) इतिहास घडला आहे. मुंबईची मुलगी जेमिमा रॉड्रिग्सने (Jemimah Rodrigues) 127 रनची अविश्वसनीय खेळी करत 339 रनच्या विशाल लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आणि भारतीय टीमला वर्ल्ड कप फायनलचे तिकीट मिळवून दिले. गिटार वाजवणारी आणि राष्ट्रीय हॉकीपटू असलेली ही 25 वर्षीय बॅटर, कॅप्टन हरमनप्रीत कौरसोबत शतकी पार्टनरशिप करून रातोरात टीम इंडियाची 'मास्टर ब्लास्टर' ठरली आहे.
सेमीफायनलमध्ये साकारला इतिहास
ऑस्ट्रेलियाने प्रथम बॅटिंग करताना भारतीय टीमसमोर 339 रनचे मोठे आव्हान ठेवले होते. कोणत्याही टीमसाठी हा स्कोअर खूप मोठा होता. भारतीय टीमने लवकर दोन विकेट गमावल्यानंतर, क्रिजवर आलेल्या जेमिमा रॉड्रिग्सने सामन्याचे चित्रच बदलून टाकले.
तिने केवळ 115 बॉल्समध्ये आपले तिसरे ODI शतक पूर्ण केले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे हे तिचे पहिलेच शतक ठरले. जेमिमाने 134 बॉल्समध्ये 14 फोर आणि 3 सिक्सरच्या मदतीने 127 रनची नाबाद खेळी केली. तिची ही मॅच-विनिंग इनिंग भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या यशस्वी रन-चेसपैकी एक ठरली.
जेमिमा आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांच्यातील निर्णायक शतकी भागीदारीने विजयाचा पाया रचला. या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय टीम आता 2 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड कप फायनल खेळणार आहे.
'बेबी ऑफ द स्क्वॉड' ते टीम इंडियाचा कणा
5 सप्टेंबर 2000 रोजी मुंबईच्या वांद्रे परिसरात जन्मलेल्या जेमिमाने 2018 मध्ये वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी साऊथ आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यावेळी तिला टीमची सर्वात लहान सदस्य, अर्थात "बेबी ऑफ द स्क्वॉड," म्हणून ओळखले जात असे. मात्र, काळाच्या ओघात हीच 'बेबी' आता टीम इंडियाचा 'कणा' बनली आहे. 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये दमदार कमबॅक करून तिने भारतीय बॅटिंगचे उज्ज्वल भविष्य दाखवून दिले.
यापूर्वी, 2017 मध्ये, 19 वर्षांखालील स्थानिक वन-डे ट्रॉफीमध्ये तिने सौराष्ट्रविरुद्ध 202 रनची नाबाद खेळी केली होती. स्मृती मानधनानंतर (Smriti Mandhana) 19 वर्षांखालील देशांतर्गत स्पर्धेत डबल-सेंच्युरी करणारी ती दुसरी भारतीय महिला बॅटर ठरली.